अंबादास दानवे यांच्या विधान भवनातील कार्यालयात अनेकांना सुखावणारं चित्र पाहायला मिळालं.
विधिमंडळाचं अधिवेशन म्हटलं की सत्ताधारी आणि विरोधकांमधला संघर्ष पाहायला मिळतो. दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर टीका टिप्पणी करतात, विरोधक सत्ताधाऱ्यांवर आरोप करतात, सत्ताधारी त्यावर प्रत्युत्तरं देतात, हे चित्र आपण नेहमीच पाहत असतो. मात्र, आज (२७ जून) विधान भवनाच्या आवारात एक वेगळं चित्र राज्यातील जनतेला पाहायला मिळालं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं विधान भवनात कार्यालय आहे. या कार्यालयात अनेकांना सुखावणारं चित्र पाहायला मिळालं. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख तथा विधान परिषदेचे आमदार उद्धव ठाकरे विधिमंडळ परिसरात दाखल झाले. त्यानंतर ते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात गेले. काही वेळाने भाजपा नेते तथा राज्याचे संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दानवे यांच्या कार्यालयात जाऊन उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाच्या सर्व आमदारांचं स्वागत केलं.
अंबादास दानवे यांच्या कार्यालयात ठाकरे गटाचे जवळपास सर्वच आमदार उपस्थित होते. चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व आमदारांचं स्वागत करून त्यांना चॉकलेटही दिलं. तर उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांना पेढा दिला. तसेच ते म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत आमच्या महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रात ३१ जागा निवडून आल्याबद्दल हे पेढे वाटत आहोत.” चंद्रकांत पाटील यांनी तो पेढा घेतला आणि आमदार अनिल परब यांच्यासह इतर आमदारांबरोबर वाटून खाल्ला. अनिल परब यांना पेढा देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “तुम्ही विधान परिषदेची निवडणूक जिंकत आहात त्याचा हा पेढा आहे.” अनिल परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सर्वांची भेट घेतली. प्रत्येकाला चॉकलेट देऊन त्याचं स्वागत केलं. तर उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांना पेढा दिला. दोन्ही नेत्यांमध्ये हसत खेळत गप्पा झाल्या. त्यानंतर चंद्रकांत पाटील तिथून निघत होते, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांना थांबवलं आणि म्हणाले, “थोडा वेळ थांबा, गप्पा मारू”. मात्र कामाच्या व्यस्ततेमुळे चंद्रकांत पाटील काही वेळात तिथून निघून गेले.
अनेक महिन्यांनंतर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये असं हसत खेळतं गप्पा मारतानाचं चित्र पाहायला मिळालं. पाटील यांनी तिधून जाताना अनिल परब यांचं अभिनंदनही केलं. त्यावेळी अंबादास दानवे पाटील यांना म्हणाले, “माझं चॉकलेट मिळालं नाही.” त्यानंतर पाटलांनी हसून त्यांच्याकडील एक चॉकलेट अंबादास दानवे यांना दिलं आणि ते तिथून निघून गेले.