

दापोली: दापोली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील ‘व्हेज वर्ल्ड’ हॉटेलमधून पुरवठा विभागाने घरगुती वापराचे ५ गॅस सिलेंडर जप्त केले आहेत. दापोलीतील पत्रकार व जिल्हा विधी सेवा समिती सदस्य मनोज पवार यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली, ज्यामुळे व्यावसायिक कारणांसाठी घरगुती सिलेंडर वापरणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
दापोलीतील ज्येष्ठ पत्रकार मनोज पवार यांना ‘व्हेज वर्ल्ड’ हॉटेलमध्ये व्यावसायिक कारणांसाठी घरगुती गॅस सिलेंडर वापरले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी स्वतः जाऊन पाहणी केली असता, त्यांना हॉटेलमध्ये ५ घरगुती वापराचे गॅस सिलेंडर आढळून आले. त्यांनी तात्काळ महसूल अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावले.
महसूल पुरवठा निरीक्षक रवी इढोळे आणि पुरवठा निरीक्षक ओंकार राणे यांनी तातडीने घटनास्थळी येऊन हे ५ गॅस सिलेंडर हॉटेलमधून जप्त केले. तपासणीत हे सर्व सिलेंडर हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या दापोलीतील ‘चैतन्य गॅस एजन्सी’ कडून ‘व्हेज वर्ल्ड’ हॉटेलला पुरवण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. जप्त करण्यात आलेले हे सर्व गॅस सिलेंडर पंचनामा करून पुरवठा विभागाने चैतन्य गॅस एजन्सीच्या ताब्यात दिले आहेत.
या प्रकरणी हॉटेल मालकाने आपल्या जबाबात सांगितले की, हे सिलेंडर त्यांच्या कामगारांच्या घरचे होते आणि ते त्यांना भरून देण्याकरिता आणले होते. पुरवठा विभागाने पत्रकारांना ही माहिती दिली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून, अद्याप कोणावरही गुन्हा नोंदवण्यात आलेला नसल्याचे पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, लवकरच दोषींवर तसेच घरगुती वापराचे गॅस सिलेंडर व्यावसायिक कामासाठी पुरवणाऱ्या गॅस एजन्सीवरही कडक कारवाई करण्याचे संकेत पुरवठा विभागाने दिले आहेत. यामुळे पैसे वाचवण्यासाठी घरगुती सिलेंडर व्यावसायिक कामाकरिता वापरणाऱ्या अनेकांमध्ये घबराट पसरली आहे.