नेरळ : सुमित क्षीरसागर – बकरी ईद हा मुस्लिम धर्मीयांचा सण जवळ आल्याने हा सण उत्साहा सोबत शांततेत साजरा करावा. सण साजरा होताना त्याला कुठलेही गालबोट लागू नये. यासोबत पोलीस प्रशासनाकडून लागेल ती मदत केली जाईल असे प्रतिपादन नेरळ पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नितीन मंडलिक यांनी केले. कळंब येथे शांतता समितीची बैठक पार पडली यावेळी मंडलिक बोलत होते.
कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज राहत आहे. तर तालुक्यातील अनेक भागात हिंदू मुस्लिम एक्याने एकोप्याने अनेक वर्षे नांदत आहेत. कळंब, सालोख अशी अनेक गावे आहेत. सध्या बकरी ईद हा मुस्लिम धर्मीयांचा सण जवळ आला आहे. तर दुसरीकडे निवडणुकांची आचारसंहिता आदी निर्बंध सुरू आहेत. त्यामुळे सण साजरा होत असताना त्याला कुठलेही गालबोट लागू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे. याच पार्श्वभूमीवर नेरळ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या कळंब पोलीस चौकीत शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. बैठकीच्या सुरवातीला पोलीस उपनिरीक्षक नितीन मंडलिक यांनी बकरी ईद सणाचे महत्व विषद केले. तसेच सण साजरा करताना तो शांततेत साजरा करावा तसेच यादरम्यान सणाला काही गालबोट लागण्याची शक्यता वाटल्यास आपण पोलिसांची मदत घेऊ शकता. यासाठी नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे तसेच आम्ही सर्व पोलीस कर्मचारी यांच्यापैकी कुणालाही आपण संपर्क साधू शकता. दरम्यान बकरी सणाची मंडलिक यांनी विस्तृत माहिती दिल्याने उपस्थित देखील अवाक झाले.
या बैठकीला कळंब मशीद मुतवल्ली आरिफ भाईजी, उपसरपंच मसूद बूबेरे, कळंब पोलीस पाटील अश्विनी बदे, अरुण बदे, मुसा पाटील, रईस बूबरे, फाइक खान, शाहिद मस्ते, असलम पानसरे, अन्वर बोंबे, अमजद लगड, मुजफ्फर बोंबे, मंजूर बोंबे आदी कळंब साळोख गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. तर नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन मंडलिक, गणेश पारधी, पोलीस शिपाई निलेश कोंडार, होमगार्ड मनीष खूने आदी उपस्थित होते.