ऐन चाळीशीतच महिलांना गाठतोय मोतीबिंदू, डोळे सांभाळा – नजर अधू होण्याचा धोका टाळा…..

Spread the love

आरोग्य : डोळे हा अतिशय नाजूक अवयव असल्याने डोळ्यांची योग्य ती काळजी घ्यायला हवी
मोतीबिंदू म्हणजे ६० पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना उद्भवणारी समस्या. असा आपला सामान्य समज होता. पण बदललेली जीवनशैली आणि वाढलेल्या स्क्रीनटाइममुळे आता वयाच्या पन्नाशीतच किंवा काहीवेळा अगदी चाळिशीतच मोतीबिंदू गाठतो. महिलांमध्येही मोतीबिंदूचे प्रमाण जास्त असून मधुमेह, हार्मोन्समध्ये होणारे बदल, ताणतणाव यांसारख्या तक्रारींमुळे महिलांमध्ये मोतीबिंदू होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. एकदा मोतीबिंदू झाला की नजर धूरकट होते त्यामुळे ऑपरेशन करुन तो काढण्याशिवाय पर्याय नसतो. मोतीबिंदू प्रत्येकाला असतोच पण तो पिकल्यावर तो काढावा लागतो. मात्र हा मोतीबिंदूचा त्रास कमी वयात होऊ नये यासाठी वेळीच योग्य ती काळजी घ्यायला हवी.

पूर्वी साधारणपणे साठी ओलांडल्यानंतर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याची गरज पडत असे. आता हे वय अलिकडे आले आहे. त्यांचे प्रमाण हे चार टक्के म्हणजेच १०० पैकी चार जणांना लवकरच मोतीबिंदू शस्त्रक्रिया करावी लागते अशी माहिती नेत्ररोगतज्ज्ञ देतात. तसेच आता याबाबत जागरुकता वाढल्याने मोतीबिंदूची ऑपरेशन होण्याचेही प्रमाण आधीपेक्षा वाढले आहे. महिलांमध्ये मेनोपॉजच्या वेळी इस्ट्रोजन या हार्मोनची पातळी कमी होते आणि त्यामुळे मोतीबिंदू होण्याची शक्यता वाढते असे नॅशनल लायब्ररी ऑफ मेडीसिनने केलेल्या एका अभ्यासात म्हटले आहे.

मोतीबिंदू लवकर होण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण…
कमी वयात मोतीबिंदू होण्याचे पहिले कारण मधुमेह आहे. मधुमेहाचा परिणाम डोळ्यांवर होतो आणि मोतीबिंदू देखील लवकर होतो. दुसरे कारण वाढलेला ताणतणाहे आहे. यामुळे वय वाढण्याची प्रक्रिया लवकर होते आणि मोतीबिंदू होतो. ज्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात स्टिरॉइड दिलेले आहेत त्यांनाही याची शक्यता असते. असे होऊ नये म्हणून पुरेसे प्रोटीन असलेला आहार घ्यायला हवा. व्यायाम करायला हवा. मधुमेह होऊ न देण्याबाबत काळजी घ्यायला हवी. झाला तरी नियंत्रणात राहील, वजन प्रमाणाबाहेर वाढणार नाही याची काळजी घ्यावी. एकूणच हा जीवनशैलीविषयक आजार असल्याने जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page