जगातले अभ्यासक, पर्यटक येतील असे स्मारक उभारु , बाबासाहेबांच्या विचारांचे, ज्ञानस्मारक असेल – पालकमंत्री डॉ. उदय सामंत,…एक हजार एकरमध्ये मंडणगडमध्ये एमआयडीसी- महसूल राज्यमंत्री योगेश कदम…

Spread the love

रत्नागिरी : जगातून अभ्यासक, पर्यटक येतील असे भव्य-दिव्य स्मारक बाबासाहेबांच्या आंबडवे गावी उभारले जाईल. हे स्मारक बाबासाहेबांच्या विचारांचे असेल, ज्ञानस्मारक असेल. बाबासाहेबांच्या विचाराला तडा घालण्याचा जो प्रयत्न करेल, त्याला महाराष्ट्र शासन नक्की शासन करेल, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली. लोकप्रतिनिधी म्हणून बाबासाहेबांच्या घटनेवर आम्ही काम करतोय, असे सांगून मंडणगडमध्ये एक हजार एकरमध्ये उद्योगमंत्र्यांच्या माध्यमातून एमआयडीसी उभारली जाईल, अशी घोषणा महसूल राज्य मंत्री योगेश कदम यांनी केली.


           

मंडणगड तालुक्यातील आंबडवे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने आज साजरी करण्यात आली. पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते सर्वप्रथम ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर डॉ. सामंत आणि राज्यमंत्री श्री. कदम यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. बाबासाहेबांच्या अस्थिकलश स्थानीही पुष्पहार अर्पण करण्यात आला.
     

यांनतर झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून शासकीय जयंती साजरी होतेय, याचा मला अभिमान आहे. बाबासाहेबांमुळेच मी आमदार, मंत्री होऊ शकलो, त्यांचे गाव माझ्या जिल्ह्यात आहे, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या जोरावर जगात देशाची आदर्श कारकीर्द सुरु आहे. जागतिकस्तरावरचे स्मारक या ठिकाणी होईल. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून निधी मिळेल. हे स्मारक बाबासाहेबांच्या विचारांचे असेल, ज्ञानस्मारक असेल. जगातला अभ्यासक, पर्यटक येथे येऊ शकेल.

*तरुणांनो अंमली पदार्थमुक्त रहा*
   

बाबासाहेबांनी समतेचा, शिक्षणाचा, व्यसनमुक्तीचा संदेश दिला. याच विचारावर अंमली पदार्थविरोधी मोहीम जिल्ह्यात सुरु केली आहे. राज्यातला अंमली पदार्थमुक्त आपला जिल्हा पाहिला करुया. खऱ्या अर्थाने घटनाकरांची ही विचारपूर्ती असेल. बाबासाहेबांचे विचार आहे त्यापेक्षा जास्त वेगाने पोहचविण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. ती प्रमाणिकरपणाने पार पाडू या, असेही पालकमंत्री म्हणाले.

*मंडणगडमध्ये एक हजार एकरमध्ये एमआयडीसी*
   

महसूल राज्यमंत्री श्री. कदम म्हणाले, पालकमंत्री आणि मी दोघेही नशिबवान आहोत. ही बाब अभिमानाने राज्यात फिरताना सांगत असतो. कारण, बाबासाहेबांचे मूळ गाव हे माझ्या मतदार संघात आणि पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यात आहे. बाबासाहेबांचे अनेक पैलू ज्यावर आपण विचार करत नाही. त्यामुळे मनाला वेदना होतात. महापुरुषांना जाती, धर्माच्या दृष्टीकोनातून बघतोय ही दुर्देवी गोष्ट आहे. संविधानातील गोष्टी वाचून पाहिल्या तर, आपण जाती, धर्माच्या बंधनातून बाहेर पडू. जात, धर्म यापलिकडे माणुसकी आहे, हा संदेश बाबासाहेबांनी दिला आहे. शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा ही शिकवण बाबासाहेबांनी दिली. स्त्रियांनी देखील शिक्षण घेण्याचा‍ विचार बाबासाहेबांनी दिला.
    

घटनेची अंमलबजावणी करणारी माणसे कशी आहेत, हे अतिशय महत्त्वाचे आहे. लोकप्रतिनिधी म्हणून घटनेवर आधारित काम करतोय. बाबासाहेबांमुळेच मला मंत्रीपद मिळाले. त्यांच्या विचारांना शोभेल असे काम माझ्याकडून झाले पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे. बाबासाहेबांना अपेक्षित असणारे काम आपण सर्वांनी केले पाहिजे. मंडणगडमध्ये एक हजार एकरमध्ये उद्योगमंत्र्यांच्या माध्यमातून एमआयडीसी उभी केली जाईल. पहिला टप्प्यात सहाशे एकर भूसंपादन आणि दुसऱ्या टप्प्यात चारशे एकर केले जाईल. या एमआयडीसीमुळे या तालुक्यात रोजगार निर्मिती होईल. शिवाय मुंबईत जाणारे स्थलांतर थांबेल. अन्य वाड्यांमध्येही बाबासाहेबांची जयंती साजरी व्हायला हवी. स्वत:पासून सुरु करु या, एकत्र येऊन काम करु या, असेही ते म्हणाले.
     

समाजकल्याण सहायक आयुक्त दीपक घाटे यांनी संविधानाच्या उद्देशिका देत मंत्री महोदयांचे स्वागत केले. यशोदा महिला बचत गट, अनिशा रमेश जाधव, प्रेरणा गायकवाड, राज वेताळ, बाळकृष्ण मेडेकर, श्रध्दा मर्चंडे या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना यावेळी राज्यमंत्री श्री. कदम यांच्या हस्ते धनादेशांचे वाटप करण्यात आले. भारतरत्न डाॕ बाबासाहेब आंबेडकर जागृती मंडळाचे सचिव नरेंद्र सकपाळ यांनी कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागृती मंडळाचे अध्यक्ष महेंद्र सकपाळ, सुरेश सकपाळ, दलितमित्र दादासाहेब पालसांडे, प्रताप घोसाळकर, प्रातांधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी, तहसिलदार अक्षय ढाकणे, दापोली गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, मंडणगड गटविकास अधिकारी विशाल जाधव, पोलदपूर गटविकास अधिकारी दिप्ती गाठ, गटशिक्षणाधिकारी नंदलाल शिंदे, सरपंच दीपिका जाकल आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page