
“राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी आज विधानभवनात महाअर्थसंकल्प मांडला. समर्पित सरकार किती योजना जनतेसाठी उपलब्ध करून देऊ शकते हे २०१९ नंतर प्रथमच पहायला मिळाले. प्रत्येक क्षेत्रासाठी नियोजनबद्ध आराखडा आणि भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याने सर्वसामान्य जनतेला नक्कीच मिळणार आहे. विरोधकही “निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन मांडलेला अर्थसंकल्प” असे म्हणत हा अर्थसंकल्प कल्याणकारी असल्याचे मान्य करत आहेत. त्यामुळे मी खात्रीने सांगू शकतो की हा महाअर्थसंकल्प जनतेचे हित डोळ्यांसमोर ठेउनच सादर करण्यात आला आहे.” असे रत्नागिरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार बाळासाहेब माने यांनी प्रतिपादन केले.
ते पुढे म्हणाले, “मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारने जो अर्थसंकल्प सादर केला त्याला पूरक असा अर्थसंकल्प आज मा. फडणवीस यांनी मांडला. यामुळे महाराष्ट्राच्या विकासाची गती वाढणार आहे. महाराष्ट्राचा दैदिप्यमान ऐतिहासिक वारसा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. श्री शिवराज्याभिषेक दिन मोठ्या जल्लोषात आणि कार्यकारणभाव ओळखून साजरा करण्यात यावा यासाठी ३५० कोटी रुपयांची तरतूद, मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूरमध्ये सार्वजनिक उद्यानांचा विकास करून छत्रपती शिवरायांची जीवनगाथा तेथे प्रसिद्ध केली जाणार असल्याचे मा. अर्थमंत्र्यांनी जाहीर केले. किल्ले शिवनेरीवर महाराजांच्या जीवनचरित्रावर संग्रहालय उभारण्यात येईल अशी घोषणाही यावेळी केली. किल्ले रत्नदुर्गवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारावा ही तमाम शिवप्रेमींची इच्छा असून त्यासाठी मी प्रयत्नशील आहे.”
“याशिवाय अन्य महत्त्वपूर्ण घोषणा आणि योजनांच्या माध्यमातून आजपर्यंत कधीही सादर झाला नाही असा सर्वांगसुंदर, सर्वसमावेशक जनतेतील प्रत्येक घटकाच्या हिताचा अर्थसंकल्प सादर करून शिंदे-फडणवीस सरकारने ‘लोकराज्य’ ही संकल्पना वास्तवात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आहेत. टीकाकारांनी जरूर टीका करावी. लोकशाहीमध्ये त्यांचे स्थान सरकारच्या बरोबरीचे आहे. मात्र टीका करतानाच जबाबदार लोकप्रतिनिधी या नात्याने जाहीर झालेल्या योजनांची अंमलबजावणी आपल्या क्षेत्रात कशाप्रकारे करता येईल याचा साकल्याने विचार करावा. रत्नागिरीतील जनतेच्या हिताचे अनेक निर्णय आणि भक्कम निधीची तरतूद केल्याबद्दल मी शिंदे-फडणवीस सरकारचे आभार मानतो. या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मी तत्पर असून यानिमित्ताने रत्नागिरीतील जनतेचा सरकारवरील विश्वास दृढ करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.” असे मत बाळासाहेब माने यांनी व्यक्त केले.