
रायगड: जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खोपोलीजवळ शनिवारी पहाटे ४ च्या सुमारास भीषण अपघात झाला. एक खासगी बस दरीत कोसळून झालेल्या या भीषण अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

या बसमध्ये एकूण ४१ जण प्रवास करत होते. त्यापैकी २७ जण गंभीर असून त्यांच्यावर जवळच्याच शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

मुंबईच्या गोरेगावमधील बाजीप्रभू वादक गट (झांज पथक) पुण्याला एक कार्यक्रम करण्यासाठी गेला होता. पुण्याहून परत येत असताना त्यांच्या बसला जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर अपघात झाला.

शिंगरोबा मंदिराच्या अलिकडील घाटात ही बस बाजूच्या दरीत कोसळली. पहाटे ४ च्या सुमारास हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

रायगडच्या खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

या बसमध्ये एकूण ४१ प्रवासी होते. त्यातल्या २७ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. बचावकार्यात खोपोलीतील पथक, खंडाळ्यातील पथक, स्थानिक पोलीस, महामार्ग पोलीस यांनी महत्त्वाची मदत उपलब्ध करून दिली.

या अपघातात आतापर्यंत १३ जण दगावले आहेत”, अशी माहिती वाहतूक पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी दिली आहे.