डायमंड गँगने चोरी केली, सदावर्ते यांचा आरोप
ठाणे : ऍड.गुणरत्न सदावर्ते यांच्या ठाण्यातील वागळे इस्टेटमधील कार्यालयात दरोडापडल्याची घटना समोर आली आहे. दरोडेखोरांनी कार्यालयाच्या खिडक्यांचे ग्रील कापून आत प्रवेश केला आणि सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर कापली. इतकंच नव्हे तर संपूर्ण कार्यलयामधील स्लायडिंग खिडक्यासुद्धा उचकटून काढल्या आणि कार्यालयातील महागडा एलईडी टीव्ही, एअर कंडिशनर, वॉशिंग मशीन आदींसह इतर वस्तू असा अंदाजे साडेचार लाख रुपयांची सामग्री घेऊन पोबारा केला.
पोलीस प्रशासन काय म्हणाले ?
दरम्यान या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मात्र डायमंड गँग वगैरे सक्रिय असल्याच्या सदावर्ते यांच्या आरोपांत तथ्य नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. तरी सुद्धा याबाबतीत अधिक चौकशी करण्यात येईल, अशी माहिती वागळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी दिली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात सदावर्तेंची याचिका
जुनी निवृत्तीवेतन योजना पुन्हा लागू करण्याच्या मागणीसाठी लाखो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी 14 मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे सरकारी रुग्णालयं आणि शाळा- महाविद्यालयांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे, असा दावा करुन वकील डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. संपकरी कर्मचाऱ्यांना संप तातडीनं मागे घेण्याचे आदेश देण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. हा संप महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा कायद्यातील तरतुदींच्या विरोधात असल्याचा दावाही सदावर्ते यांनी हायकोर्टात केला.
सदावर्तेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चप्पल मारुन संपकऱ्यांकडून निषेध
दुसरीकडे कोल्हापुरात वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चप्पल मारुन सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांचा निषेध केला. सदावर्ते यांनी राज्यातील सर्व आंदोलनाची वाट लावली आहे. मराठा आंदोलन, एसटी कर्मचारी आंदोलन या सगळ्यात मीठाचा खडा सदावर्ते यांनी टाकला आहे, असा आरोप सरकारी कर्मचाऱ्यांनी केला. त्यामुळे जोरदार घोषणाबाजी करत सदावर्ते यांचा निषेध करण्यात आला.