अपघातानंतर ट्रकचालकाने ट्रकसह पळ काढला.
खेड : मुंबई गोवा महामार्गवरील भोस्ते घाटात अपघातांचे सत्र अजूनही सुरूच आहे. आज (बुधवार) दुपारी चारच्या सुमारास भोस्ते घाटात तिहेरी अपघात झाला. यामध्ये दोन ट्रक व एका कारचे माेठं नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती समजताच पाेलिस घटनास्थळी पाेहचले आहेत
भोस्ते घाटातील तीव्र उतरावर असणाऱ्या अवघड वळणावर मुंबईच्या दिशेने जात असलेल्या कारला पाठीमागून येणाऱ्या दोन ट्रकची एका बाजूने धडक बसली. या अपघातानंतर एका ट्रक चालकाने ट्रकसह घटनस्थळावरून पळ काढला.
दूस-या ट्रकची वळणावरील भिंतीला जोरदार धडक बसल्याने ताे रस्त्याकडेलाच अडकला. या अपघाताची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनांचा पाेलिसांनी पंचनामा केला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.
दरम्यान या अपघातात पुण्यातील कारचे व ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या तिहेरी अपघातामधील ट्रकचा पाेलिस शाेध घेत आहेत.