मुंबई- मुंबईतील गोरेगाव परिसरातील असणाऱ्या समर्थ नावाच्या इमारतीला गुरुवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून, सध्या कुलिंगचं काम सुरु आहे.
आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण गुलदस्त्यात आहे. या घटनेमुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव परिसरात समर्थ नावाची पाच मजली इमारत आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास या इमारतीच्या पार्किंगला भीषण आग लागली. बघता बघता आगीने संपूर्ण इमारतीला विळखा घातला. यामध्ये इमारतीत राहणारे अनेक नागरिक जखमी झाले. या घटनेची माहिती तातडीने अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार ही आग इमारतीच्या तळमजल्यावर लागली. यानंतर काही क्षणात या आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीत तळमजल्यावर दुकाने, भंगार साहित्य, पार्क केलेली दोन चाकी वाहने, चार चाकी वाहने भस्मसात झाली. आगीमुळे नागरिक भयभीत झाले होते इमारतीतील नागरिक फ्लॅट सोडून टेरेसवर गेले. दरम्यान, हे नागरिक वर अडकले होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले. आतापर्यंत आगीतून ३० जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.