ब्रेकिंग बातमी…
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेकरिता जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्यभरातून ५ हजार विशेष बसेस सोडण्यात येणार

Spread the love

मुंबई- आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेकरिता जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातून 5 हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. 25 जून 2023 ते 5 जुलै 2023 या दरम्यान या विशेष गाड्या धावणार आहेत. तसंत, वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी (27 जून रोजी) 200 अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

पंढरपूर आषाढी यात्रेसाठी एसटीने बस सेवेसाठी केलेल्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

पंढरपूर आषाढी यात्रा हा महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे. यामध्ये एसटीच्या प्रवासी वाहतुकीला अनन्य साधारण महत्व आहे. याकाळात एसटीकडून आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा प्रवाशांना वारकऱ्यांना दिल्या जाव्यात. भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूरपर्यंत घेऊन जाणे तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे घरी आणून सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

आषाढी यात्रेसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा प्रदेशातून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेसाठी सुमारे 5000 गाड्या सोडण्याचे नियोजन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे. औरंगाबाद प्रदेशातून 1200, मुंबई 500, नागपूर 100, पुणे 1200, नाशिक 1000 तर अमरावती येथून 700 अशाप्रकारे यात्रेसाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून बसेस सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान,यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय,संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page