मुंबई- उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये मोबाईलमधील ऑनलाईन गेमिंगद्वारे धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन गेमच्या सहाय्यानं महाराष्ट्रात ४०० जणांचं धर्मांतर केल्याचा गौप्यस्फोट गाझियाबाद सहाय्यक पोलिस आयुक्तांनी केला आहे.विशेष म्हणजे गाझियाबादमधल्या या धर्मांतराचं महाराष्ट्राशीतील मुंब्रा येथे असणारे कनेक्शन समोर आले आहे.
मुंब्रा या ठिकाणी ४०० जणांचं धर्मांतर करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऑनलाईन धर्मांतर करणाऱ्या मुख्य आरोपीनं हा गौप्यस्फोट केल्याचं डीसीपी निपुण अग्रवाल यांनी सांगितलंय.मोबाईल गेमच्या आडून ब्रेन वॉश करत धर्मांतर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दुसरा आरोपी शाहनवाज फरार आहे. गाझियाबाद पोलीस शाहनवाजची आई मुमताजचा जबाब मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्याची शक्यता आहे.
धर्मांतराच्या उद्देशाने ब्रेन वॉश
मोबाईल गेमच्या नावाखील धर्मांतर करण्याचं प्रकरण उत्तर प्रदेश पोलिसांनी उघड केलं. ही एक मोठी टोळी असून ती ऑनलाईन गेम खेळणाऱ्या मुलांना हेरते. सुरुवातीला या खेळात या मुलांना हरवलं जातं, मग त्यात फसवलं जातं आणि पुढे त्यांचा धर्मांतराच्या उद्देशाने ब्रेन वॉश केला जातो. ही मुलं ऑनलाईन गेमच्या माध्यमातून डर्टी धर्मांतराचे शिकार होतात.
कसे केले जाते धर्मांतर?
दिल्लीच्या गाझियाबादमध्ये देखील असंच घडले आहे. ऑनलाईन गेमच्या सहाय्याने दोन अल्पवयीन मुलांचं धर्मांतर केलं गेले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही मुस्लिम मुलं गैर-मुस्लिम नावाने प्रोफाईल बनवून गेम खेळायची. ही टोळी गेम खेळणाऱ्यांना हरवून त्यांना कुराण पठण करायला लावायची आणि जाणूनबूजून जिंकवायची. जी मुलं कुराण वाचायची त्यांना धर्मांतर करणाऱ्या टोळीतील सदस्य प्रोत्साहन देण्यासाठी खेळात हरायचे. टोळीतील सदस्य हिंदू आयडी तयार करुन कुराणात रस दाखवणाऱ्यांशी गप्पा मारायचेआणि त्यांचा ब्रेनवॉश करायचे. इस्लामकडे कल दाखवणाऱ्या मुलांना झाकीर नाईकचे विषारी व्हिडिओ दाखवायचे आणि
इस्लामिक साहित्य पुरवायचे. मुलांचे ब्रेनवॉश करून त्यांना पैसे देण्याचं आमिष द्यायचे आणि संधी साधत त्यांचं धर्मांतर केलं जायचं.
गाझियाबादमधल्या धर्मांतराला महाराष्ट्र कनेक्शन आहे. कारण यातील एक आरोपी शाहनवाज मकसूद खान हा ठाण्याच्या मुंब्र्यातील असल्याचं समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शाहनवाज खान ३१ मे पासूनच फरार आहे. त्याआधी त्याने त्याच्या कुटुंबियांना सोलापूरला शिफ्ट केलं. तर १ जूनला गाझियाबाद पोलिसांनी मुंब्रा पोलिसांशी संपर्क करुन त्यांची मदत मागितली पण तोपर्यंत उशीर झाला होता .
केरला स्टोरीमध्ये हिंदू मुलींना टार्गेट करुन त्यांचं धर्मांतर कसं केलं जातं हे दाखवले. पण धर्मांतराच्या याच पॅटर्नमध्ये बदल करुन मोबाईल गेम खेळणाऱ्यांना आता टार्गेट केलं जातंय. त्यात एकट्या मुंब्र्यातून ४०० जणांचं धर्मांतर झालं असेल तर ही नक्कीच चिंतेची बाब आहे.