भाजपने महाविकास आघाडीचं राज्यातील सरकार पाडलं. पैशाच्या जोरावर लोकशाहीविरोधी सत्तांतर केलं. आमची उद्या सत्ता आली तर आम्ही मोदींसारखं असं सत्तांतर घडवून आणणार नाही. त्यांच्यासारखं आम्ही ठरावीक उद्योगपतींचं भलं करणार नाही. आमचा केंद्रबिंदू हा सामान्य माणूस राहील. सामान्य लोकांच्या हिताचंच आम्ही काम करू, अशी ग्वाही काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी दिली.
स्वत:साठी विमान विकत घेतले, पण… प्रियंका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला काय?
नंदुरबार- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मित्रांना सर्व काही विकलं. मोदींनी मोठ्या उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपये माफ केले. स्वत:साठी विमान घेतलं. पण ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काहीच दिले नाही. खरबपतींचे मोदी मसीहा आहेत, असा घणाघाती हल्ला काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केला आहे. मोदींना आपण खूप पाठिंबा दिला. काहीच फायदा झाला नाही. आता बदलाची वेळ आली आहे. 10 वर्ष झाली आहेत. विकास झाला नाही. महागाई वाढली आहे, असंही प्रियंका गांधी म्हणाल्या.
प्रियंका गांधी नंदूरबारमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. जोवर आवाज बंद होत नाही तोवर बोलत राहणार आहे. सरकार बदलेपर्यंत आम्ही बोलत राहणार आहोत. काँग्रेसची गॅरंटी आहे. आम्ही सर्व आश्वासन पूर्ण करणार आहोत. गोरगरीबांना आम्ही 25 लाखापर्यंत उपचार मोफत करणार आहोत. कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ महिलेच्या खात्यात एक लाख रुपये देणार आहोत. पदवीधरांना नोकरी देणरा आहोत. आमची सत्ता आल्यावर आम्ही देशातील 30 लाख पदे भरणार आहोत. परीक्षा शुल्क माफ करणार आहोत. पिकांना किमान मूल्य देणार आहोत. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी आयोग बनवणार आहोत. शेती व्यवसायातील जीएसटीची जाचक अट काढणार आहोत, असं प्रियंका गांधी म्हणाल्या.
त्यांचे नेते त्यांना घाबरत आहेत..
गरीबांच्या अनेक समस्या आहेत. त्यांच्या समस्या सोडवायच्या सोडून मोदीच त्यांच्याकडे स्वत:च्या समस्या मांडत आहेत. त्यामुळेच मोदींचा जनतेशी संपर्क तुटला आहे. देशातील गरीब खचला आहे. त्याला उत्पन्न मिळत नाही. शेती करणं कठीण झालं आहे. पण मोदींना हे कळत नाही. त्यांना कोणी सांगण्याची हिम्मत करीत नाही. त्यांचे नेतेही त्यांच्याकडे जात नाहीत. त्यांना त्यांचे नेते घाबरत आहेत, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली.
आदिवासींसोबत एक फोटो नाही…
प्रियंका गांधी यांनी यावेळी इंदिरा गांधी यांच्या आठवणींना उजाळा दिला. इंदिरा गांधी सर्व समाजाला सोबत घेऊन जायच्या. त्यांच्यात मिसळायच्या. मोदींचा गेल्या दहा वर्षात आदिवासींसोबत एकही फोटो काढला नाही. कधी आदिवासींमध्ये गेले नाहीत, असं सांगतानाच काळा पैसा आला पाहिजे होता, 2 करोड रोजगार दिले पाहिजे होते पण ते केलं नाही. संविधान बदलण्याची भाषा करण्याची हिम्मत यांना आली कुठून? संविधान बदलण्याची हिंमत यांना दिली कुणी? तर मोदींनी परवानगी दिली, असा आरोप त्यांनी केला.