एकतर्फी झालेल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर ८ गडी राखून विजय मिळवला.
कर्णधार रोहित शर्माने रचले विक्रमांचे नवे शिखर…

जनशक्तीचा दबाव न्यूज | दिल्ली | ऑक्टोबर १२, २०२३.
‘विश्वचषक २०२३’ मधील भारताचा दुसरा सामना दिल्ली अरुण जेटली स्टेडीयम दिल्ली येथे खेळवण्यात आला. नाणेफेक जिंकून अफगाण कर्णधार हश्म्तुल्लाह शाहीदी याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र बुमराहच्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर अफगाण फलंदाजांची डाळ शिजली नाही. आघाडीचे खेळाडू ठराविक अंतराने बाद झाल्यावर कर्णधार शाहीदी व अझमतुल्लाह ओमरझाई यांनी पडझड थांबवत डावाला आकार दिला. शतकी भागीदारी साकारत संघाला सुस्थितीत आणल्यावर हार्दिक पंड्याच्या एका अप्रतिम चेंडूने ओमरझाईला चकवत त्याच्या यष्ट्यांचा वेध घेतला. पुढे संघाची धावसंख्या २२५ असताना शाहीदी वैयक्तिक ८० धावा काढून फिरकी गोलंदाज कुलदीप यादवची शिकार ठरला. तळाच्या फलंदाजांना प्रतिकार करण्याची फारशी संधी मिळालीच नाही. अखेर मर्यादित ५० षटकांमध्ये अफगाणिस्तानने ८ गडी गमावून २७२ धावा जमवल्या.
प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने अफगाण गोलंदाजांची पिसे काढायला सुरुवात केली. चौकार-षटकारांची आतिषबाजी पहायला मिळाल्याने प्रेक्षकांना ‘पैसा वसूल’ आनंद मिळाला. दीडशतकी सलामी दिल्यानंतर युवा ईशान किशन राशीद खानच्या गोलंदाजीवर इब्राहीम झाद्रानकडे झेल देऊन तंबूत परतला. त्याने ५ चौकार आणि २ षट्कार ठोकत ४७ धावा जमवल्या. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीने आपला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा फॉर्म कायम ठेवत आक्रमक रोहितला साथ दिली. रोहितने आपल्या तुफानी खेळीत अनेक विश्वविक्रमांना गवसणी घातली.
- डावाच्या ५ व्या षटकात विश्वचषक स्पर्धांमध्ये १००० धावांचा टप्पा पार केला. मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकरने ही किमया २० डावांमध्ये साध्य केली होती. रोहित शर्माला मात्र यासाठी १९ डाव खेळावे लागले. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरसह रोहित संयुक्तपणे प्रथम स्थानावर आहे.
- रोहितने आठव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर डीप मिड-विकेटच्या दिशेने अझमतुल्लाहच्या चेंडूला भिरकावले आणि ख्रिस गेलला मागे टाकत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षट्कार ठोकण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला.
- १८ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर १ धाव घेऊन रोहितने कारकिर्दीतील ३१ वे शतक साजरे केले. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित तिसऱ्या स्थानावर आहे. प्रथम तीन स्थानांवर आता भारतीय फलंदाज आहेत. सचिन तेंडूलकर आणि विराट कोहली हे दोघेच त्याच्या पुढे आहेत.
- अवघ्या ६३ चेंडूंत जलद शतक साजरे केल्याने रोहितने तब्बल ४० वर्षांपूर्वीच्या कपिल देव यांच्या विक्रमाला मोडीत काढले आहे.
- सचिन तेंडूलकरचा विश्वचषकातील ६ शतकांचा विक्रमदेखील रोहितने संपुष्टात आणला. आजचे हे त्याचे ७ वे शतक होते.
- एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वांत वेगाने शतक साजरे करण्याच्या बाबतीत रोहित शर्मा ५ व्या स्थानी आहे. विराट कोहली (५२ चेंडू), विरेंद्र सेहवाग (६० चेंडू), विराट कोहली (६१ चेंडू), मो. अझरूद्दीन (६२ चेंडू) आणि आता रोहित शर्मा (६३ चेंडू)
- विश्वचषक स्पर्धांमधील वेगवान शतकांच्या बाबतीत रोहित शर्मा ६ व्या स्थानावर आहे. इयान मॉर्गन (५७ चेंडू), डीव्हीलीयर्स (५२ चेंडू), मॅक्सवेल (५१ चेंडू), केव्हिन ओब्रायन (५० चेंडू), एडन मर्क्रम (४९ चेंडू)
- सलामीवीर म्हणून एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक शतके साजरी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडूलकर (४५ शतके) नंतर रोहित (२९ शतके) दुसऱ्या स्थानावर पोचला आहे. श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याला त्याने याबाबत मागे टाकले आहे.
- विश्वचषक स्पर्धांमध्ये सर्वाधिक धावा जमवणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा तिसऱ्या स्थानी पोचला आहे. याबाबतीत त्याने माजी कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकले असून आता त्याच्यापुढे सचिन तेंडूलकर आणि विराट कोहली आहेत.
- विश्वचषक स्पर्धांमध्ये भारताकडून सर्वाधिक षट्कार ठोकणारा खेळाडू हा बहुमानही आता रोहित शर्माने आपल्या नावे केला आहे.
- रोहित शर्मा – ईशान किशन यांनी आज पहिल्या गड्यासाठी साकारलेली १५६ धावांची भागीदारी भारतासाठी ५ व्या क्रमांकाची सर्वोत्तम भागीदारी ठरली आहे. पहिल्या क्रमांकावर रोहित – लोकेश राहुल यांची १८९ धावांची भागीदारी आहे.
- ११२ चेंडूत १५६ धावांची भागीदारी साकारताना धवगती ८.३५ इतकी जबरदस्त होती. एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये १५०+ धावांची भागीदारी करताना ही ५ व्या क्रमांकाची धावगती आहे. जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉय यांनी २०१९ मध्ये साकारलेली भागीदारी ९.०८ च्या धावगतीने होती. अजूनही हा विक्रम अबाधित आहे.
८४ चेंडूत ५ खणखणीत षट्कार आणि १६ चौकारांनी १३१ धावांची खेळी सजवून रोहित राशीद खानच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरने विराट कोहलीला समयोचित साथ देत विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. यादरम्यान विराटने आपले ६८ वे अर्धशतक पूर्ण केले. तो ५६ चेंडूत ६ चौकारांसह ५५ धावा करून नाबाद राहिला. तर १ गगनचुंबी षट्कार व १ चौकार मारून आयर २५ धावांवर नाबाद राहिला. कर्णधार रोहित शर्मा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. भारत आपला पुढील सामना १४ ऑक्टोबर रोजी पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडीयमवर खेळणार असून देशवासियांना विश्वचषक स्पर्धेमध्ये पाकिस्तानवर सलग ९ व्या विजयाची प्रतिक्षा राहील.