
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज खोके दिन साजर करण्यात येत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आज गद्दार दिन म्हणून साजरा करणार आहे. मात्र असा कुठलाही दिन साजरा करण्यास मुंबई पोलिसांकडून प्रतिबंध करण्यात आला आहे. तसंच मुंबई पोलिसांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस देखील पाठवण्यात आल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील वर्षी बंड केल्याने शिवसेनेत उभी फूट पडली. विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाच्या रात्रीच म्हणजेच २० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची साथ सोडत बंड केलं. त्याला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. या निमित्ताने आज खोके दिन तसंच गद्दार दिन साजरा केला जात आहे. ठाकरे गटाच्या तसंच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर तशाप्रकारच्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत. मात्र यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ठाकरे गटाच्या शाखाप्रमुख त्यासोबतच माजी नगरसेवकांना आणि काही नेत्यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे कुठलाही दिन साजरी करण्यास मुंबई पोलिसांकडून प्रतिबंध करण्यात आला आहे. हे दिन साजरा केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा सूचना या नोटीसमध्ये देण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शिवसेना आजचा दिवस स्वाभिमान दिन म्हणून साजरा करणार आहे तर ठाकरे गट जागतिक खोके दिन म्हणून पाळणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस 20 जून गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून प्रत्येक तालुका स्तरावर गद्दार दिन साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. तर आदित्य ठाकरेंनी आजचा दिवस जागतिक खोके दिवस साजरा करावा असे आदेश दिले आहे. वर्धापन दिनाच्या दिवशी गद्दारीवरुनही उद्धव ठाकरे आणि शिंदे-फडणवीसांनी एकमेकांवर टीकास्त्र सोडलं आहे. कालच्या राज्यव्यापी शिबिरात उद्धव ठाकरेंनी बंडावरुन शिंदेंवर टीका केली होती. तर उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार असल्याचं म्हणत शिंदे-फडणवीसांनी पलटवार केला.