ठाणे – भाजपच्या महाविजय २०२४ अभियानातर्गंत आज ठाण्यात भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात मोठे शक्तिप्रदर्शन केले. गडकरी रंगायतन येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर पदयात्रा काढण्यात आली.
यावेळी ढोल, ताशांसह भाजपचे शेकडो कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर सेंजॉन शाळेजवळ चौक सभेचे आयोजन करण्यात आले होते.
भाजपच्या महाविजय २०२४ अभियानातर्गत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचे दौरे करीत असून त्यांनी मंगळवारी ठाणे लोकसभा मतदार संघाचा दौरा केला. राज्यातून ४५ खासदार हे ५१ टक्के मते घेऊन नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा निवडून देतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. विधानसभेत भाजपचे २२५ आमदार असतील, असा दावाही बावनकुळे यांनी केला.
कोणी कुठे उभे राहायचे ? कोणी कोणती जागा घ्यायची याचा निर्णय पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल. मात्र महायुतीचा कोणातही उमेदवार असेल, प्रत्येक जागेची जबाबदारी ही भाजपचीच असेल, असा विश्वास बावनकुळे यांनी या वेळी व्यक्त केला.