राज्यातील दोन हजाराहून अधिक ग्रामपंचायतींचा कौल आज जाहीर झाला. यात महायुती आणि महाविकास आघाडीकडून विजयाचे दावे केले जात असले तरी ठाणे, रायगड, पालघरमध्येही मतदारांनी संमिश्र कौल नोंदवला आहे.
ठाणे जिल्ह्यात ६१ पैकी २६ ग्रामपंचायतींवर भाजपने झेंडा फडकवल्याचा दावा केला आहे. रायगडमध्येही महायुतीने ८५ टक्के उमेदवार विजयी झाले; तर पालघरमध्ये महायुती-महाविकास आघाडीला समसमान जागा मिळाल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे.
ठाणे जिल्ह्यात ६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजपने सर्वाधिक २६ ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकावला आहे; तर शिवसेनेने (शिंदे गटाने) देखील १६ ग्रामपंचायतींवर भगवा फडकावला आहे. दुसरीकडे ठाकरे गटानेही ग्रामपंचायत निवडणुकीत आपले अस्तित्व टिकवून ठेवत ११ ग्रामपंचायती ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती आहे.
रायगडमध्ये महायुतीचे घटक पक्ष असलेले शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि भाजपकडून आक्रमक बांधणी करण्यात आली. परिणामी महायुतीचे साधारण ८५ टक्के उमेदवार विजयी झाले, तर ‘इंडिया’ आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्ष वगळता अन्य पक्षांना फारसे यश आले नाही.
पालघर जिल्ह्यात भाजप-शिंदे गटाला केवळ १५ ग्रामपंचायतींवर समाधान मानावे लागले. तर ठाकरे गट ९ , माकप ९, बविआ ५, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ४, स्थानिक आघाडीने तीन जागेवर आपला झेंडा फडकावला.