पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपानं देशभरात अबकी बार 400 ‘पार’चा नारा दिला आहे. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजपाला ‘तीनशे’चा आकडा गाठणेही कठीण असल्याच्या प्रतिक्रिया राजकीय तज्ञ व्यक्त करीत आहेत.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच भारतीय जनता पक्षानं तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची तयारी सुरू केली आहे. यावेळी भाजपानं 400 हून अधिक जागा जिंकण्याचा दावा केला आहे. अबकी बार 400 पारचा नारा दिल्यानंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा आकडा 370 वर आणलाय. मात्र, भारतीय जनता पक्षासह त्यांच्या मित्रपक्षांच्या सध्याच्या राजकीय स्थितीवर नजर टाकल्यास भाजपानं केलेला दावा फोल असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.
300 जागाही येणे कठीण :
या संदर्भात बोलताना ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी सांगितलं की, ‘भारतीय जनता पक्षानं केलेला दावा फोल आहे. भाजपानं गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या जागासुद्धा त्यांच्या पदरात पडण्याची शक्यता नाहीये. गेल्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षानं पुलवामा हल्ला, कलम 370 चा नारा दिला होता. देशभक्तीचा ज्वर देशभरात निर्माण करून त्यांनी जागा जिंकल्या होत्या. मात्र, आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. राम मंदिराची लहर केवळ हिंदी भाषिक पट्ट्यात अधिक आहे. त्यामुळं त्याचा फायदा त्यांना भारतभरात होणार नाही. वास्तविक भाजपानं 400 पारचा दावा केला, तरी प्रत्यक्षात सत्ता स्थापन करण्यातही भाजपाला अडचणी येतील. तसंच त्यांच्या 300 पेक्षा अधिक जागा निवडणून येणार नसल्याचं मत वानखेडे यांनी व्यक्त केलंय.
देशभरातील काय आहे स्थिती? :
‘भाजपाला हिंदी भाषिक पट्ट्यात अधिक जागा मिळतील, हे स्पष्ट आहे. आधी आपण या जागांचा विचार करू. उत्तर प्रदेश 80, मध्य प्रदेश 29, बिहार 40, झारखंड 14, उत्तराखंड 5, हिमाचल प्रदेश 4, राजस्थान 25, गुजरात 26, तसंच छत्तीसगडमध्ये 11 जागा आहेत. या जागांची एकूण संख्या ही 234 आहे. या नऊ राज्यांत 234 पैकी 200 जागा भाजपानं जिकंल्या तरीसुद्धा भाजपाला बहुमतासाठी 73 तसंच 300 पार करण्यासाठी 100 जागांची गरज आहे’, असं वानखेडे म्हणाले.
दक्षिणेकडील राज्यातील काय आहे परिस्थिती :
‘दक्षिणेकडील राज्यांमध्ये काँग्रेस तसंच प्रादेशिक पक्षांची पकड मजबूत आहे. कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आहे. दक्षिणेतील सहा राज्यांमध्ये ओडिसा 21, कर्नाटक 28, तामिळनाडू 39, केरळ 20, आंध्र प्रदेश 25, तेलंगणात 17 जागा आहेत. या जागांची बेरीज केल्यास ती 150 इतकी होते. दीडशे पैकी भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात केवळ 15 ते 20 जागाच येण्याची शक्यता’ असल्याचं वानखेडे म्हणाले.
80 जागा येणार कुठून :
‘भारतीय जनता पक्षाला किंवा एनडीएला सत्ता स्थापनेसाठी बहुमतासाठी अधिक जागांची गरज असणार आहे. यापैकी पंजाबमधील 13 जागा, हरियाणा 10, दिल्लीच्या ७ जागा या भारतीय जनता पक्षाला मिळणं कठीण आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर या राज्यातील स्थिती आणखी वाईट झाल्यामुळं भाजपाला या राज्यांमधून 30 पैकी दहा जागा पदरात पडतील का? याची चाचपणी भाजपा करत आहे. आतापर्यंतची एकूण बेरीज पाहिल्या भाजपा 230 पर्यंत किंवा 232 पर्यंत जागा जिंकू शकतो. उरलेल्या जागांसाठी भाजपाची सर्व मदार पश्चिम बंगाल, महाराष्ट्र या दोन राज्यांवर असणार आहे. म्हणून या दोन राज्यांना विशेष महत्त्व आहे. पश्चिम बंगालमध्ये 42 पैकी जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा तसंच महाराष्ट्रात 48 पैकी जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा भाजपा प्रयत्न करीत आहे. परंतु सद्यस्थितीत भाजपाला 40 पेक्षा अधिक जागा मिळतील’, अशी परिस्थिती नसल्याचे वानखेडे सांगतात. ‘म्हणजेच भाजपाला 300 जागांचा आकडा गाठणं कठीण असून त्यांना सत्ता स्थापनेसाठी झगडावं लागेल’, असं वानखेडे यांचं म्हणणं आहे.
महाराष्ट्रात वाढला मित्र पक्षांचा शेपटा :
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक किरण नाईक म्हणाले की, ‘भारतीय जनता पक्षासह त्यांच्या मित्र पक्षांना यावेळी जागांसाठी निश्चितच झगडावं लागणार आहे. भाजपाला यंदाची निवडणूक सोपी नाही, हे लक्षात आलं आहे. म्हणूनच त्यांनी महाराष्ट्रात मित्र पक्षांची संख्या वाढवली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपा तसंच शिवसेना मिळून 42 जागा जिंकून आल्या होत्या. यामध्ये शिवसेनेनं 18 जागा जिंकत मोठा वाटा उचलला होता. आता शिवसेनेत फूट पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत खासदार, आमदार गेले. मात्र, प्रत्यक्षात मतदार अजूनही उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहेत. त्यामुळं भाजपानं ताकद वाढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला फोडून अजित पवार यांना सोबत घेतलं. मात्र, त्यामुळंही फारसा फरक पडताना दिसत नाहीये, असं लक्षात आल्यामुळं भाजपानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलासोबत घेतलंय. इतकंच काय पण राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम पक्षालाही सोबत बांधून ठेवण्याचा प्रयत्न भाजपानं चालवला आहे. यावरून असं दिसतंय की, महाराष्ट्रात महायुतीला गेल्या निवडणुकी इतकं यश मिळणार नाही, हे स्पष्ट आहे. तसं झाल्यास महाराष्ट्रातून मिळणारी रसद निश्चित कमी होईल. त्यामुळं केंद्रात सत्ता स्थापन करण्यात भाजपासह मित्र पक्षांना अडचण निर्माण होईल’, असं नाईक म्हणाले.