भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे १९ ऑक्टोबरला रत्नागिरीत..

Spread the love

महाविजय- २०२४ साठी नियोजन

रत्नागिरी – आगामी लोकसभा निवडणूक व विधानसभांच्या निवडणुकीबाबत मार्गदर्शन करण्याकरिता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे येत्या गुरुवारी (ता. १९) रत्नागिरी दौऱ्यावर येणार आहेत. महाविजय २०२४ अंतर्गत ते महाराष्ट्रात सर्व मतदारसंघात दौरे करत आहेत. ते निवडक ३५० पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असून पक्षीय धोरण, कार्यक्रम राबवण्याबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सावंत म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरीत येत आहेत. ते सकाळी एसटी स्टॅंड, जैन मंदिर, राम आळी परिसरातील नागरिक, रहिवाशांशी संवाद साधतील. त्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप करतील. सकाळी ११ च्या सुमारास माळनाका येथील स्वयंवर मंगल कार्यालयात ते कार्यकर्त्यांनी संबोधित करतील. निवडणुकीसाठी काय रणनिती आखली पाहिजे याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत.

प्रदेशाध्यक्षांच्या स्वागताची तयारी सुरू झाली असून सर्वत्र भाजपाचे झेंडे लावण्यात येणार असून बॅनरही झळकणार आहेत. याकरिता नियोजन करण्यात येत आहे. भाजपासह युवा मोर्चा, महिला मोर्चा यासह सर्व मोर्चांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.

विमानतळाला भागोजीशेठ यांचे नाव द्यावे

रत्नागिरीच्या विमानतळाला दानशूर व रत्नागिरीचे सुपुत्र भागोजीशेठ कीर यांचे नाव द्यावे अशी भाजपाची मागणी आहे. भागोजीशेठ यांचे महान कार्य पाहता विमानतळाला नाव देण्यासाठी आम्ही प्रदेशाध्यक्षांसह केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया व निवेदन पाठवणार असल्याचे राजेश सावंत यांनी स्पष्ट केले. तसेच भागोजीशेठ कीर यांच्या नावाला अन्य राजकीय पक्षांनीही पाठिंबा द्यावा, अशी मागणीही सावंत यांनी केली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page