
नाशिक : भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजय चौधरी यांनी गुरुवारी भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन दोनदिवसीय बैठकीच्या नियोजनाबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, शुक्रवारी (दि. १०) सायंकाळी ६ ला पदाधिकारी व निमंत्रितांची बैठक होईल. या बैठकीस २०० पदाधिकारी, निमंत्रित उपस्थित राहणार आहेत. शनिवारी (दि. ११) सकाळी १० ला पक्षाचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश कार्यकारिणीची बैठक होईल. या बैठकीस भाजपचे केंद्रातील, राज्यातील मंत्री, २३ खासदार, प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, संघटन सरचिटणीस, सरचिटणीस, कोअर कमिटी सदस्य आदींसह सुमारे ७०० पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन सत्रानंतर पक्ष संघटनात्मक बाबींवर विचारमंथन केले जाईल. दुपारच्या सत्रात राजकीय, कृषी व सहकार या विषयांवरील प्रस्तावांवर चर्चा तसेच जनतेच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल केंद्रातील भाजप सरकारच्या अभिनंदनाचा ठराव संमत केला जाईल. सायंकाळी ५ ला मान्यवरांच्या उपस्थितीत बैठकीचा समारोप होणार आहे.
बैठकीचे नियोजन सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, या बैठकीत हे दोन्ही प्रमुख नेते उपस्थित राहणार नसल्याचे विक्रांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
भाजप सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेले भवन निर्माण, लोकसभा प्रवास, स्वावलंबी भारत, मन की बात, एक भारत श्रेष्ठ भारत, फ्रेंड्स ऑफ बीजेपी, एक मंत्री एक दिवस एक विद्यापीठ, धन्यवाद मोदीजी, नवमतदार नोंदणी, युवा वॉरियर्स, डेटा मॅनेजमेंट व उपयोग, जी-२० परिषद, आर्थिक विकासाची दिशा, सोशल मीडिया, विधानसभा निवडणुकीनिमित्त महाविजय संकल्प आदी विषयांवर चर्चा या बैठकीत होणार आहे.
जाहिरात :
