रत्नागिरी : जेथे छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने कैद केले त्या संगमेश्वर परिसरात महारांचा भव्य पुतळा आणि वस्तू संग्रहालय उभारण्यासाठी शिंदे फडणवीस सरकार कडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० कोटींचा निधी मंजूर केला. संगमेश्वर तालुक्यात जेथे छत्रपती संभाजी महाराज याना औरंगजेबाने बंदी केले त्या कसबा येथे शनिवारी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मरक्षण दिन समितीच्या वतीने झालेल्या धर्म रक्षण दिनाच्या कार्यक्रमात बोलताना भाजपचे आ. प्रसाद लाड यांनी हि घोषणा शासनाच्या वतीने केली.
यावेळी बोलताना आ. लाड म्हणाले कि, कसबा येथील कार्यक्रमाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना मी सकाळी मेसेज करून माहिती दिली. या परिसरात छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक झाले पाहिजे अशी इथल्या लोकांची मागणी असल्याचे सांगितले तेव्हा उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी तत्काळ बोलून यासाठी १० कोटी रुपये मंजूर केल्याचे सांगितले. तशी घोषणाच या कार्यक्रमात करण्याबद्दल आपल्याला त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे इथल्या स्मारक आणि वस्तुसंग्रहालयासाठी राज्य शासन सकारात्मक असून माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली येत्या २५ मार्च पर्यंत इथल्या जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जागा निश्चित करून तसा प्रस्ताव तयार करून तो शासनाला सादर करावा असे आ. लाड यांनी सांगितले . एकीकडे महाराजांचे स्मारक आपण उभे करणारच आहोत पण ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांचे हाल हाल करून त्यांना मारलं त्या औरंगजेबाचं थडगे जोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज नगरातून उचकटून टाकत नाही तोपर्यन्त महाराजांच्या बलिदान सार्थकी लागणार नाही. त्यासाठी तुम्हा सगळ्याची साथ आणि सहभाग हवा आहे असे आवाहन प्रसाद लाड यांनी यावेळी केले. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार निलेश राणे, आ. शेखर निकम, माजी आ. राजन तेली, आयोजक प्रमोद जठार उपस्थित होते.