भाजपने शिवसेनेच्या 5 जागांवर केले उमेदवार जाहीर:जागावाटपात शिवसेना शिंदे गटाचा त्याग, इतर जागांवरही दावा ठोकण्याची शक्यता?…

Spread the love

मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 99 जणांना संधी देण्यात आली आहे. यापैकी पाच मतदारसंघ भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या खेचल्या असल्याचे दिसत आहे. धुळे शहर, अचलपूर, देवळी, नालासोपारा, उरण या पाच मतदारसंघात भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आहे.

धुळे येथे 2019 साली शिवसेनेचे हिलाल माळी हे उमेदवार होते, मात्र येथून भाजपने यंदा अनुप अग्रवाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अचलपूर येथे शिवसेनेकडून सुनिता फिसके या उमेदवार होत्या, येथे भाजपने आता अतुल तायडे यांना उमेदवारी दिली आहे. देवळी मतदारसंघात शिवसेनेचे समीर देशमुख उमेदवार होते, त्यांचा मागच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता, यंदा भाजपने राजेश बकाने यांना उमेदवारी दिली आहे. नालासोपारा येथे शिवसेनेकडून प्रदीप शर्मा उमेदवार होते, यंदाच्या निवडणुकीत भाजपने राजन नाईक यांना उमेदवारी दिली आहे. तर उरण येथे शिवसेनेकडून मनोहर भोईर हे उमेदवार होते, यंदा भाजपने महेश बालदी यांना उमेदवारी घोषित केली आहे.

दरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महायुतीच्या झालेल्या बैठकीत त्याग करण्याचा सल्ला दिला होता. मुख्यमंत्री पदासाठी आम्ही त्याग केला आहे, तर जागावाटपासाठी तुम्ही त्याग करा, असा सल्ला अमित शहा यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिला होता. त्यानुसार भाजपने शिवसेनेच्या या पाच मतदारसंघात उमेदवार घोषित केला असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या पाच मतदारसंघातील नालासोपारा येथे भाजपचा आमदार तसेच भाजपचा पाठिंबा असलेला अपक्ष उमेदवार नसताना देखील भाजपने या मतदारसंघात उमेदवार घोषित केला आहे.

भाजपने आखलेल्या या रणनीतीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते काय प्रतिक्रिया देतात याकडे देखील आता सर्वांचे लक्ष असणार आहे. तसेच भविष्यातील जगांवर देखील या रणनीतीचा परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे. यात पालघर, बोईसर या जागांचा समावेश असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजप आता शिवसेनेच्या या जगांवर देखील उमेदवार जाहीर करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page