
प्रशांत यादव यांनी या व्यावसायिकाला सर्वोतोपरी मदत करत पुन्हा उभारी घेण्यासाठी दिली नवी उमेद,व्यावसायिकाने मानले प्रशांत यादव यांचे आभार…
संगमेश्वर- संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथील एका गरीब व्यावसायिकाची निसर्गाने चांगलीच परीक्षा घेतली. महामार्गाच्या बाजूलाच वडापाव, चहाचा व्यवसाय करणाऱ्या दांपत्याच्या टपरीखालची जमीनच खचली आणि पोटापाण्याचा आधार एका क्षणात उद्धवस्त झाला. संगमेश्वर दौऱ्यावर असलेले भाजप नेते प्रशांत यादव यांना हे समजताच त्यांनी तात्काळ गाडीचा ताफा थांबवून त्या व्यावसायिकाकडे धाव घेतली. आपले विश्वासू तुरळचे माजी सरपंच शंकरशेठ लिंगायत यांच्याकडून माहिती घेतली. पाहणी केली आणि सर्वोतोपरी मदत करत पुन्हा उभारी घेण्यासाठी नवीन उमेद दिली.
संगमेश्वर तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर तुरळ येथे लक्ष्मण डिके व सारिका डिके हे दांपत्य गेले काही वर्षे तात्पुरती शेड काढून वडापाव, चहा तर कधी उसळ, मिसळ असे पदार्थ बनवून ग्राहकांना सेवा देतानाच आपला उदरनिर्वाह करत होते. घरगुती चव, आणि आपुलकीची सेवेमुळे ते चांगली प्रसिद्धी घेऊन होते. ग्राहकांचा कल दिवसेंदिवस वाढत होता. परंतु कोणाची तरी नजर लागली आणि निसर्गाने जणू पोटापाण्याचा आधार असलेल्या त्या शेडच्या खालची जमीनच काढून घेतली. प्रचंड पावसामुळे भुसभुशीत जमीन चक्क घसरली. त्यामुळे व्यावसाय ठप्प पडला. डिके दांपत्य डोक्याला हात लावून बसले. ही परिस्थिती तुरळचे माजी सरपंच तसेच भाजप नेते प्रशांत यादव यांचे अत्यंत विश्वासू शंकरशेठ लिंगायत यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ सूत्रे हलवली. चिपळूण नागरी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव तसेच वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांच्याकडे संपर्क साधला. दरम्यान शुक्रवारी सकाळी प्रशांत यादव संगमेश्वर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी अचानक आपल्या गाड्यांचा ताफा तुरळ येथे थांबवला. शंकरशेठ लिंगायत यांना बरोबर घेऊन थेट त्या गरीब व्यावसायिकाकडे पोहचले. शंकरशेठ लिंगायत यांनी सर्व वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली आणि समोरची परिस्थिती बघताच प्रशांत यादव ऍक्शन मोडवर आले. त्यांनी तात्काळ आपल्या सहकाऱ्यांना सांगून आता तात्पुरते नव्हे तर एक मजबूत संरक्षण भिंत उभारून देण्याचे आदेशच दिले. यावेळी राहुल पवार, शांताराम डिके, अशोक पाचकले, तुरळ रिक्षा संघटनेचे अध्यक्ष एकनाथ लिंगायत, दिनेश निवळेकर, शांताराम आदवडे, संजय राऊत, अभिषेक लिंगायत उपस्थित होते.
डिके दांपत्याला जणू गहिवरून आले. निसर्गाने हिरावून नेले, पण प्रशांत यादवांनी त्यापेक्षा जास्त दिले. या भावनेतून लक्ष्मण डिके व सारिका डिके अक्षरशः नतमस्तक झाले. एका गरीब तरुण व्यावसायिकाला नवी उमेद आणि ऊर्जा देतानाच घाबरू नका, मी आणि माझे सहकारी पूर्ण ताकदीने तुमच्या बरोबर आहेत, असे ठाम आश्वासन देऊन शंकरशेठ लिंगायत यांना लक्ष देण्याच्या सूचना देत डिके दांपत्याचा व्यवसाय सुरू होऊ दे मी स्वतः चहा घेण्यासाठी येथे येतो, असे सांगत प्रशांत यादव पुढील कार्यक्रमाला मार्गस्थ झाले. या विषयाची मोठी चर्चा आता तुरळमध्ये ऐकण्यास मिळत आहे.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर