जनशक्तीचा दबाव न्यूज | रत्नागिरी | फेब्रुवारी १३, २०२३.
कर्तव्यतत्पर पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या दुर्दैवी मृत्युनंतर त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून धीर देण्यासाठी आज रत्नागिरीचे माजी आमदार, भाजपा युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब माने व स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रसिद्ध होणारे ‘साप्ताहिक बलवंत’च्या मालक व संपादक सौ. माधवी माने यांनी राजापूर तालुक्यातील कशेळी येथील ओवळीची वाडी येथील रहात्या घरास भेट दिली.
अत्यंत साधी रहाणी असणार्या पत्रकार वारीसे यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यांच्या पश्चात त्यांच्या मातोश्री व त्यांचा मुलगा असे दोघे आहेत. त्यांचा मुलगा यश रत्नागिरी येथील आयटीआय तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेत असून त्याचे मातृछत्र यापूर्वीच हरपले होते. आता या दुर्दैवी घटनेमुळे त्याचे आईवडील दोघेही हयात नाहीत. हा त्याच्या जीवनावर काळाने केलेला मोठा आघात आहे.
“लोकशाहीचा चौथा स्तंभ असणार्या माध्यम प्रतिनिधींवर आद्य पत्रकार ‘दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर’ यांच्या भूमीतच हल्ला होणे हे निंदनीय आहे. वैचारिक पातळीवर नागरिकांना सजग करणे हे कोणत्याही पत्रकाराचे नैतिक कर्तव्य असते. आज वारीसे यांच्यासारख्या प्रामाणिक आणि निष्ठावंत पत्रकाराला सत्याचा सातत्याने पाठपुरावा केल्याने जीव गमवावा लागला आहे. याची दखल घेऊन मा. देवेंद्रजींनी या आणि अशा घटनांबाबत कठोर पावले उचलावीत यासाठी मी पत्रव्यवहार करणार आहे.” असे सौ. माधवीताई माने यांनी सांगितले.
“भूमिकेचा विरोध हिंसेने होऊच शकत नाही. त्यासाठी प्रकट वाटाघाटी हाच संयुक्तिक मार्ग आहे. मात्र याच वाटाघाटी जेव्हा गुप्त होऊ लागतात तेव्हा भ्रष्टाचार बोकाळतो. आणि यातूनच एखाद्या प्रामाणिक शशिकांतला आपला जीव गमवावा लागतो. रत्नागिरी जिल्ह्यात अशी घटना घडेल याची कल्पना स्वप्नातदेखील केली नव्हती. पण दैवगतीपुढे आपण हतबल असतो. शशिकांत वारीसे एक आदर्श पत्रकार होते असेच मी म्हणेन.” अशा शब्दांत माजी आमदार बाळासाहेब माने यांनी वारीसे यांच्या मातोश्रींचे सांत्वन केले. यशजवळ बोलताना बाळासाहेब म्हणाले, “तुझे वडील एक सच्चे पत्रकार होते. त्यांनी भ्रष्टाचाराचा बळी ठरण्यापेक्षा भ्रष्टाचाराविरुद्ध लढून आपला जीव गमावला आहे. आम्हाला त्यांचा अभिमान आहे. येणार्या अनेक पिढ्यांसाठी तुझे वडील प्रेरणादायी ठरतील. आता त्यांचे दिवसकार्य संपन्न झाल्यानंतर तू तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. त्यांच्या तुझ्याकडून असणार्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत कर. तुझ्या वडीलांना हीच खरी श्रद्धांजली असेल. आजीची व्यवस्थित काळजी घे.”
याप्रकरणी शासनाकडून योग्य ती कार्यवाही जलदगतीने व्हावी यासाठी स्वतः लक्ष घालून या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन बाळासाहेबांनी दिले. यावेळी त्यांच्यासोबत सौ. माधवी माने व मिहीर माने उपस्थित होते.