नांदेडमध्ये BJP ची दमछाक होत आहे का?:PM नरेंद्र मोदी अन् गृहमंत्री अमित शहा यांच्या सभांच्या धडाक्यामुळे रंगली चर्चा…

Spread the love

नांदेड- माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे नांदेड लोकसभेची जागा अलगद भाजपच्या खिशात जाणार असा दावा केला जात होता. पण या मतदार संघात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सभांचा धडाका लावला आहे. त्यातच उद्या 20 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही येथे प्रचारसभा होणार आहे. त्यामुळे नांदेड लोकसभा मतदार संघात भाजपची दमछाक होत आहे का? असा सवाल राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पराभव केला होता. त्या निवडणुकीच वंचित बहुजन आघाडीने दीड लाखांहून अधिक मते मिळवली होती. पण आता अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे नांदेड लोकसभेची जागा सलग दुसऱ्यांदा भाजपच्या खिशात जाईल असा दावा केला जात आहे. पण या मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा होणार आहेत. या दोघांच्या एकाच मतदार संघात सभा केव्हाच होत नाहीत. हा योग नांदेडमध्ये येत असल्यामुळे हा मतदार संघ विजयाच्या दृष्टिकोनातून भाजपसाठी अवघड जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेडची जागा भाजपसाठी सुरक्षित मानली जात होती. पण जमिनीवरील वास्तव वेगळे आहे. पंतप्रधान मोदी व अमित शहा नांदेडमध्ये सभा घेणार आहेत. मोदी व शहा यांचे एकाच मतदार संघात सभा घेणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते. पण नांदेडमध्ये भाजपच्या या 2 बड्या नेत्यांच्या सभा होत असल्यामुळे राजकीय वर्तुळात हा मतदार संघ भाजपसाठी अवघड जात आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे 2014 च्या मोदी लाटेतही अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा नांदेडचा गड राखला होता. पण 2019 मध्ये भाजपच्या चिखलीकरांनी त्यांचा पराभव केला. आता चव्हाण स्वतः भाजपमध्ये असून, प्रतापराव चिखलीकर पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात आहेत. पण भाजपची प्रचाराची रणनीती पाहता भाजपला येथून विजयाची खात्री वाटत नाही असा दावा केला जात आहे.

अशोक चव्हाणांना विजयाचा विश्वास

याविषयी खुद्द अशोक चव्हाण यांना छेडले असता त्यांनी नांदेडमध्ये भाजपचा विजय पक्का असल्याचा विश्वास व्यक्त केला. नांदेडमध्ये भाजपची स्थिती उत्तम असून, ही जागा नक्की जिंकू असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी आतापर्यंतच्या अनेक लोकसभा निवडणुकांत नांदेडमध्ये पंतप्रधानांच्या सभा होत असल्याच्या इतिहासाकडेही त्यांनी यावेळी पत्रकारांचे लक्ष वेधले.

माझी बदनामी टाळण्यासाठी भाजपला मताधिक्य द्या…

दुसरीकडे, अशोक चव्हाण यांच्या एका विधानामुळे त्यांना आपल्या बदनामीची भीती वाटत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हवा आहे. विकसित भारतासाठी आपल्या मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. त्यासाठी मी त्यांना नांदेडच्या सीटची गॅरंटी दिली आहे. तुम्ही सर्वांनी मिळून त्यांना गावोगावी लीड दिली पहिजे. वरिष्ठ नेत्यांमध्ये माझी बदनामी होऊ नये असे वाटत असेल तर भाजपला मताधिक्य द्या, असे भावनिक आवाहन चव्हाण यांनी एकेठिकाणी बोलताना केले आहे. यामुळे ही चर्चा रंगली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page