⏩नवी दिल्ली- कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते धर्मेंद्र प्रधान यांनी १८९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत ५२ नवीन नावे आहेत. यादीत इतर मागासवर्गीयमधील ३२, अनुसूचित जाती मधील ३०आणि अनुसूचित जमाती मधील १६ उमेदवारांचा समावेश आहे. भाजपने पहिल्या यादीत९डॉक्टर, सेवानिवृत्त आयएएस , आयपीएस , ३१ पदव्युत्तर आणि ८ महिलांना तिकीट दिले आहे.
विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे शिगगाव मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत . भाजपचे इतर प्रमुख नेते रमेश जारकीहोळी गोकाक आणि गोविंद एम कर्जोल हे मुधोळ मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्याचवेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी हे चिक्कमगलुरूमधून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या, डीके शिवकुमार यांना टक्कर देण्यासाठी भाजपने सोमन्ना आणि आर अशोक यांना उमेदवारी दिली आहे. ते प्रत्येकी दोन जागांवर निवडणूक लढवणार आहेत.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बीएस येडियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्र यांना शिकारीपुरा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. राज्यमंत्री बी श्रीरामुलू हे बेल्लारी ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. बसवराज सोमप्पा बोम्मई हे २००८ पासून कर्नाटकातील शिगगाव मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. २००८ आणि २०१३ मध्ये ते जलसंपदा आणि सहकार मंत्री होते. बोम्मई यांनी चौथ्या येडियुरप्पा सरकारमध्ये गृह, सहकार, कायदा आणि न्याय, संसदीय कामकाज आणि कर्नाटक विधानमंडळ मंत्री म्हणून काम केले आहे.
शिगगाव विधानसभा जागा हावेरी जिल्हा आणि मुंबई कर्नाटक प्रदेशात येते. या मतदारसंघात एकूण २,०९,६२९मतदार असून त्यात सर्वसामान्य मतदार, अनिवासी भारतीय मतदार आणि सेवा मतदारांचा समावेश आहे. सर्वसाधारण मतदारांमध्ये १,०९,४४३ पुरुष, १,००,०७७ महिला आणि ६ इतर आहेत. या भागातील मतदारांचे लिंग गुणोत्तर ९१.३६आहे आणि साक्षरता दर ७४% च्या जवळपास आहे.
⏩१० मे रोजी मतदान, १३ मे रोजी निकाल
कर्नाटक विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात १० मे रोजी होतील. त्याचा निकाल १३मे रोजी लागणार आहे. कर्नाटकात ५.२१ कोटी मतदार आहेत, जे २२४ विधानसभा जागांवर मतदान करणार आहेत. भाजप लवकरच उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करणार आहे.