पुणे- बिटकाॅइन गुन्ह्यातील पैशाचा वापर तत्कालीन पुणे पाेलिस आयुक्त अमिताभ गुप्ता व पाेलिस उपायुक्त भाग्यश्री नवटक्के यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लाेकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी खासदार सुप्रिया सुळे व काँग्रेस नेते नाना पटाेले यांनी केल्याचा गंभीर आराेप माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यांनी केला आहे. याबाबत त्यांनी गाैरव मेहता याच्याकडून प्राप्त झालेल्या काही आॅडिआे क्लिपदेखील सादर केल्या आहेत. या क्लिपमधील आवाज हा खासदार सुप्रिया सुळेंचा नाही तर एआयच्या मदतीने तयार करण्यात आल्याची टीका सुळे समर्थक व आघाडीमधील काही नेते, सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. मात्र, संबंधित आॅडिआे क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे यांचाच असून त्याबाबतचे आणखी पुरावे माझ्याकडे असून त्याचा गाैप्यस्फाेट लवकरच करणार आहे, असे सांगत सुळे यांच्या आवाजातील आणखी दाेन क्लिप उघडकीस आल्याची माहिती माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यांनी दिली आहे.
पाटील म्हणाले, शरद पवार मी केलेल्या आराेपासंदर्भात बिटकाॅइन प्रकरणात मी एक वर्ष कारागृहात राहून आल्याने लक्ष देण्याची गरज नसल्याचे सांगतात. मात्र, माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेदेखील १४ महिने कारागृहात राहिल्यानंतर ते त्यांना कशा प्रकारे महत्त्व देत आहेत हे दिसून येत आहे. सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या कन्या असल्याने त्यांना पाठीशी घालण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. तसेच तपास यंत्रणादेखील दबावाखाली असून सुळे या शरद पवारांची मुलगी असल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई करत नाहीत, अन्यथा सामान्य व्यक्ती या प्रकरणात असती तर त्यावर कडक कायदेशीर कारवाई झाली असती. मी काेणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून माझ्या हाती जी माहिती आली आहे त्यानुसार पुरावे पाहून मी बिटकाॅइन गैरव्यवहाराची माहिती उघड केली. ईडीने गाैरव मेहता याचे माेबाइल जप्त केले असून त्यातून अधिक माहिती पुढील काळात समाेर येईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
पाेलिस संरक्षण द्या : पाटील
सुप्रिया सुळे व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांच्यावर आराेप केल्यानंतर माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यांनी त्यांच्या जिवाला धाेका असल्याचे सांगत गृह विभागाकडे पाेलिस संरक्षणाची मागणी केली आहे. तसेच निवडणूक आयाेगाने पाटील यांनी केलेल्या आराेपाच्या अनुषंगाने त्यांच्याकडे विचारणा केली की, काेणत्या मतदारसंघात हा प्रकार घडला आहे, काेणते राजकीय पक्ष त्याच्याशी संबंधित आहेत तसेच काेणत्या अन्य व्यक्ती त्यात सहभागी आहेत याबाबतची माहिती पाटील यांनी निवडणूक आयाेगास दिली आहे. तसेच राज्य गुप्तचर यंत्रणेनेदेखील त्यांच्याकडून आराेपाबाबत कागदपत्रे मागितली आहेत.
काय आहे नवीन क्लिपमध्ये-
सुप्रिया सुळे यांच्या आवाजातील क्लिपमध्ये सांगण्यात आले की, अमिताभ ही माझी जबाबदारी नाही कशा प्रकारे हे प्रकरण हाताळायचे. कॅश निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, काेणत्याही परिस्थितीत मला कॅश हवी आहे. तर, दुसऱ्या क्लिपमध्ये अमिताभ गुप्ता सांगतात की, सुप्रिया जर माझ्यासाेबत काही चुकीचे झाले तर मी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससाेबत सर्वांना उघड करेन, असे या क्लिपमध्ये म्हटले आहे. दरम्यान, या व्हिडिओ क्लिपची दिव्य मराठी पुष्टी करत नाही.