चिपळूण- चालकाचा ताबा सुटल्याने एका एसटी बसने रस्त्याच्या कडेला दुचाकीसह उभ्या असलेल्या तरुणाला धडक देत अक्षरश: फरपटत नेले. त्यात या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल गुरुवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास चिपळूण नजीकच्या खेर्डी येथे घडली. अनिकेत विजय दाभोळकर (३४) असे या अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
ही घटना घडली तेव्हा त्याचे वडीलही त्याच्यासोबत होते. त्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या मुलाचा अपघातीमृत्यू झाला. मंडणगड-धाराशिव ही एसटी बस सकाळी ८ वाजता चिपळूण आगारातून मार्गस्थ झाली. चिपळूण-कराड मार्गावर खेर्डी दत्तमंदिरासमोर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. रस्ता सोडून बस साइडपट्टीकडे वेगाने गेली. त्याचवेळी अनिकेत दाभोळकर हा भाजी आणि फळे घेण्यासाठी तेथे आपल्या दुचाकीसह उभा होता. बसने त्याला दुचाकीसह फरफटत नेले आणि अक्षरशः चिरडले.
अपघात घडताच शेकडो लोक घटनास्थळी जमा झाले. अनिकेतला लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. अनिकेतला चिरडल्यानंतर बस तेथीलच एका फळ विक्रेत्याच्या शेडमध्ये घुसली होती. त्यामुळे त्याचेही नुकसान झाले. चिपळूण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. संध्याकाळी खेर्डी येथील स्मशानभूमीत अनिकेत याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघाताची नोंद चिपळूण पोलिस स्थानकात करण्यात आली असून मंडणगड डेपोचे एसटी चालक गोपाळ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चिपळूण पोलिस अधिक तपास करत आहेत.
अनिकेत कोकण रेल्वेमध्ये मँकेनिकल इंजिनिअर म्हणून कामाला होता. बुधवारी त्याच्या भावाचे लग्नकार्य उरकले. त्याची सत्यनारायणाची पूजा गुरुवारी होती. त्याच पूजेसाठी भाजी आणि फळे आणण्यासाठी अनिकेत वडिलांना सोबत घेऊन बाजारात आला होता. त्यावेळी हा अपघात घडला. अनिकेत सर्पमित्र म्हणून परिचित होता. अनिकेत आपल्या वडिलांसोबत खरेदीला आला होता. त्याचे वडील विजय दाभोळकर यांनी आपल्या डोळ्यादेखत हा अपघात आणि आपल्या तरुण मुलाचा दुर्दैवी मृत्यू पाहिला. त्यामुळे ते खाली काेसळले. हा प्रसंग सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणणारा होता.