हेमंत सोरेन यांना मोठा धक्का; नाराज माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन करणार भाजपा प्रवेश…

Spread the love

झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख हेमंत सोरेन यांनी कारागृहातून परतल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र त्यांनी चंपाई सोरेन यांना हटवून ही कृती केल्यानं पक्षात मोठी दुफळी निर्माण झाली. त्यामुळे नाराज असलेल्या चंपाई सोरेन यांनी भाजपाच्या वाटेवर जाण्याचं निश्चित केलं आहे. 30 ऑगस्टला चंपाई सोरेन हे भाजपा प्रवेश करणार आहेत.

रांची : झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख हेमंत सोरेन यांनी कारागृहातून परतल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचा राजीनामा घेतला. त्यामुळे झारखंड मुक्ती मोर्चा पक्षात मोठी दुफळी निर्माण झाली असून नाराज झालेल्या चंपाई सोरेन यांनी भाजपात प्रवेश करण्याचं निश्चित केलं आहे. चंपाई सोरेन यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असून ते 30 ऑगस्टला रिचसर भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे हा हेमंत सोरेन यांना मोठा धक्का मानला जात आहे.

चंपाई सोरेन करणार भाजपा प्रवेश –

मुख्यमंत्रिपदावरुन हटवल्यानंतर नाराज झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते चंपाई सोरेन 30 ऑगस्ट रोजी भाजपा प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे. चंपाई सोरेन यांनी 26 ऑगस्टला सायंकाळी उशिरा दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत भेट घेतली. या बैठकीला आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याशिवाय चंपाई सोरेन यांचा मुलगा बाबूलाल सोरेन आदी उपस्थित होते. बैठकीनंतर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी चंपाई सोरेन आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीचं छायाचित्र सोशल मीडियावर प्रसिद्ध केलं. यावेळी त्यांनी चंपाई सोरेन यांच्या भाजपा प्रवेशावर शिक्कामोर्तब केलं.

हेमंत सोरेन यांना मोठा धक्का-

झारखंड मुक्ती मोर्चा आणि ‘इंडिया’ आघाडीसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेत्या सीता सोरेन यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याशिवाय कोल्हाणच्या राजकारणात प्रभाव असलेले माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्या पत्नी गीता कोडा यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांना मोठा धक्का बसला.

चंपाई सोरेन यांच्या भाजपा प्रवेशानं मिळणार बळ-

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रांचीमध्ये 26 ऑगस्ट रोजी चंपाई सोरेन यांच्या भाजपा प्रवेशाकडं लक्ष वेधलं. “चंपाई सोरेन गेल्या 5-6 महिन्यांपासून आपल्या संपर्कात असून त्यांनी भाजपामध्ये यावं, अशी आपली वैयक्तिक इच्छा आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं. चंपाई सोरेन यांच्या भाजपा प्रवेशानं पक्षाला बळ मिळेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. चंपाई सोरेन यांच्याबाबत राजकीय चर्चा करण्याची आता वेळ आली आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. विशेष म्हणजे हिमंता विस्वा सरमा यांच्या वक्तव्यानंतर काही तासांतच दिल्लीत संपूर्ण रणनीती निश्चित करण्यात आली.

पक्षात आपला अपमान झाल्याची चंपाई सोरेन यांना खंत-

चंपाई सोरेन यांना कोल्हान किंवा रांचीमध्ये भाजपाचं सदस्यत्व दिलं जाणार आहे. या कार्यक्रमाला भाजपाचे अनेक बडे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवल्यापासून ते नाराज होते. 20 ऑगस्टला त्यांनी सोशल मीडियावर आपल्या मनातील भावना शेअर केल्या. आपल्याच पक्षात आपला अपमान झाल्याचं त्यांनी या पोस्टमधून सांगितलं. त्यामुळे 3 जुलैला त्यांनी यापुढं झारखंड मुक्ती मोर्चा पक्षात नसल्याचा निर्णय घेतला. आपल्या बोलण्यातून त्यांनी थेट हेमंत सोरेन यांच्यावर निशाणा साधला. यानंतर रक्षाबंधनाच्या दिवशी चंपाई सोरेन हे दिल्लीत पोहोचले. त्यानंतर 20 ऑगस्टला सरायकेला परतल्यानंतर त्यांनी कोल्हाणमधील त्यांच्या समर्थकांच्या मनस्थितीचा अंदाज घेतला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page