मुंबई- जनशक्ती प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांची राज्य सरकारमार्फत दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. दिव्यागांसाठी स्वातंत्र्य मंत्रालय असावे यासाठी गेल्या वीस वर्षांपासून बच्चू कडू हे मागणी करत होते. त्यांचा दिव्यांगणासाठी सातत्यपूर्ण लढा सुरु होता.मात्र,आज अखेर या लढ्याला यश मिळालं असून आमदार बच्चू कडू यांना दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष बनवून शासनाकडून मंत्री पदाचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे.
दिव्यांग कल्याण खात्याचे अभियान दिव्यांगांच्या दारापर्यंत पोहचवण्यासाठी बच्चू कडू यांना मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार बच्चू कडू यांना हा मंत्री पदाचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. शासनाने परिपत्रक काढून बच्चू कडू यांना मंत्री पदाचा दर्जा जाहीर केला आहे.
बच्चू कडू हे प्रहार संघटनेचे अध्यक्ष आहेत.अमरावतीतून विधानसभेवर निवडून आलेले बच्चू कडू हे सामाजिक क्षेत्रात कायमच उत्तम काम करत आले आहेत. त्यांनी आजवर महाराष्ट्रभरातील दिव्यांग आणि वृद्धांसाठी सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या आहेत. तसंच शेतकऱ्यांसाठी देखील त्यांनी अनेकदा आवाज उठवला आहे.आज अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं असून त्यांच्यावर राज्यसरकारने महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.