मुंबई- राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेत राज्यातील ४४९ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत.
शिंदे सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर राज्यात विविध विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यातच आज ४४९ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात काही असे पोलीस अधिकारी आहेत, ज्यांनी बदल्यासाठी विनंती अर्ज केला होता. अनेक महिन्यांपासून हे अधिकारी बदल्यांच्या प्रतिक्षेत होते. अखेर त्यांची विनंती मान्य करत बदल्या करण्यात आल्या आहेत.
पोलिस विभागाने जारी केलेल्या पत्रकानुसार, मुदत पूर्ण झालेल्या ३३६ आणि विनंतीनुसार ११३ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या आज करण्यात आल्या. अशा एकूण ४४९ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या पोलिस विभागाने केल्या आहेत. याआधी राज्य सरकारने 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. यातच प्रसिद्ध सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचाही समावेश होता. त्यांची मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.