महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले विजयी!
जनशक्तीचा दबाव न्यूज | नागपूर | फेब्रुवारी ०२, २०२३.
नागपूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. नुकत्याच हाती आलेल्या नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक निकालात महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले हे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या नागो गाणार यांचा पराभव केला. हा भाजपसाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे.
सुधाकर आडबाले यांच्या विजयानंतर ट्विट करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला डिवचलं आहे. भाजपच्या मातृसंस्थेच्या बालेकिल्ल्यातच महाविकास आघाडीचा भाजपला दणका. नागपूर शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे सुधाकर आडबाले विजयी, असं ट्विट नाना पटोले यांनी केलं आहे. पहिल्या फेरीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले यांना एकूण १४,०६९ मतं पडली आहेत.
तर भाजपचे नागो गाणार यांना ६,३६६ मत पडली असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर राजेंद्र झाडे यांना २,७४२ मत पडली आहेत. नागपुरात सुधाकर आडबाले, नागो गाणार आणि राजेंद्र झाडे यांच्यामध्ये लढत होती. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले हे विजयी झाले आहेत. दरम्यान दुसरीकडे औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात देखील महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे हे आघाडीवर आहेत. त्यांनी विजयाकडे वाटचाल केल्याचं चित्र आहे. त्यामुळे नागपूर पाठोपाठ औरंगाबादमध्ये देखील भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे.