आमचे ग्रामपंचायत सदस्य हरवले म्हणत नागरी समस्यांवरून भीम आर्मी व आजाद समाज पार्टी आक्रमक, नेरळ ग्रामपंचायतीवर जन आक्रोश मोर्चा…

Spread the love

नेरळ : सुमित क्षीरसागर – नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक ३ मध्ये नागरिकांना रस्ते, पाणी, स्वच्छ्ता अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तर एकच वेळ तेही गढूळ येणाऱ्या पाण्यामुळे महिलांना पाण्याच्या समस्येतून मार्ग काढताना नाकी नऊ येत आहेत. तर दुसरीकडे या वार्डमधून दोन सदस्य निवडून दिलेल्या असताना एक सदस्य वार्डात दिसतच नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीला अनेकदा तक्रार करूनही नागरिकांच्या समस्या आजवर सुटलेल्या नाहीत. तेव्हा नेरळ सम्राट नगर व परिसरातील नागरिकांनी भीम आर्मी व आजाद समाज पार्टीच्या नेतृत्वाखाली नेरळ ग्रामपंचायतीवर जन आक्रोश मोर्चा काढला. आमचे ग्रामपंचायत सदस्य हरवले म्हणत नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला आहे.

नेरळ ग्रामपंचायत हद्दीत सम्राट नगर येथील जि. एस. सदावर्ते चौक ते पी. डी. गायकवाड चौक येथील रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रहदारी होत असते मात्र या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे दुचाकी वरून येणाऱ्या जाण्याऱ्या लोकांचे अनेक वेळा अपघात होत आहेत. या रस्त्यालगत लहान मुलांची शाळा असल्यामुळे लहान मुलांना अपघात होवून हानी पोहचण्याची शक्यता नाकरता येत नाही. अनेक वेळा या बाबतीत नागरिकांनी, रहिवासी यांनी तक्रारी करून सुद्धा ग्रामपंचायत नेरळ मधील सदस्य व सरपंच तसेच ग्रामविकास अधिकारी हे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. तर सम्राट नगर येथील रहिवासी घरपट्टी, पाणीपट्टी इतर सर्व कर वेळेवर भरत असून सुद्धा त्यांना नागरी सुविधा का मिळत नाहीत असा प्रश्न देखील ग्रामस्थ आता उपस्थित करू लागले आहेत.

सम्राट नगर येथे पाणी टंचाई हा विजय देखील जटील झाला आहे. पाणी प्रेशरणे व जास्त वेळ येत नसल्यामुळे महिलांना घर काम करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच वेळेवर घंटागाड़ी येत नसल्यामुळे कचरा नियोजन होत नसून परिसरात दुर्गंधी पसरून लोकांचे सार्वजिक आरोग्य धोक्यात आलेले आहे. शौचालय वेळेवर सफाई होत नसल्यामुळे रोगराई पसरत आहे. तसेच शौचालयांची अवस्था दुरावस्था झालेली आहे.

सम्राट नगर मधील प्रवेश कमान अनेक वर्षे जशीच्या तशी आहे. तिचे नूतनीकरण होत नाही. याकडे ग्रामपंचायतीचे लक्ष नाही. सम्राट नगर मधील रमाबाई आंबेडकर मार्ग ते जि. एस. सदावर्ते चौक येथे अनधिकृत पार्किंग होत असते त्यामुळे सम्राट नगर मधील रहिवाश्यांना महिला, लहान मुले, नागरिकांना ये जा करणे असहाय्य झालेल आहे. इमर्जन्सी हॉस्पिटल जाण्यासाठी रुग्णवाहिका जाण्यासाठी सुद्धा रस्ता उपलब्ध नसतो.

या सर्व समस्यांबाबत सम्राट नगर ग्रामस्थांनी तक्रारी करून देखील नेरळ ग्रामपंचायतीकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. यामुळे शुक्रवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी भीम आर्मी व आजाद समाज पार्टीच्या नेतृत्वाखाली नेरळ ग्रामपंचायतीवर जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नेरळ सम्राट नगर येथून निघालेला जा मोर्चा नेरळ बाजारपेठ करत मारुती मंदिर, ब्राह्माणआळी येथून थेट नेरळ ग्रामपंचायतीवर धडकला. यावेळी आजाद समाज पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सुमित साबळे यांनी नागरिकांच्या समस्येचा पाढा ग्रामपंचायत येथे वाचला तर जिल्ह्यातील सगळ्यात मोठी असलेली ग्रामपंचायत गरीब झाली. एका माहिती अधिकार अर्जाच्या उत्तरात नेरळ ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती खालावली असल्याने विकासकामे करता येत नसल्याचे लेखी उत्तर देण्यात आल्याने याचा निषेध करत असल्याचे सम्यक सदावर्ते यांनी सांगितले.

यावेळी नेरळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच मंगेश म्हस्कर यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत येत्या १५ दिवसात समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. तर पुढील ३० दिवसात आमच्या नागरी समस्या सोडवा अन्यथा नागरिक तीव्र आंदोलन करतील असा इशारा आजाद समाज पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अड. सुमित साबळे यांनी नागरिकांच्या वतीने दिला. तर यावेळी नागरिकांच्या समस्यांचे निवेदन ग्रामपंचायतीला देण्यात आले. या मोर्च्यामध्ये लहान मुलांसह महिला व नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page