
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात मंत्री नीतेश राणे यांना डिवचत चांगलाच समाचार घेतला. सभागृहात प्रश्न विचारल्यावर चिडचिड करायची नसते, चिडायचे असेल तर त्यासाठी बाहेर मैदान मोकळे आहे. सभागृहात अशी चिडचिड चालत नाही, असे जाधव यांनी ठणकावून सांगितले.
प्रश्नोत्तराच्या तासात भास्कर जाधव यांनी कोकणातील मासेमारीशी संबंधित प्रश्न उपस्थित केला. कोकणातील समुद्रात परराज्यातील अवैध बोटींकडून मोठ्या प्रमाणावर मासेमारी होत असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री नीतेश राणे काहीसे चिडचिड करत असल्याचे जाणवल्यानंतर जाधव यांनी त्यांचा समाचार घेतला.
भास्कर जाधव म्हणाले, मंत्री महोदयांनी माझा प्रश्न वाचला की नाही, याबाबत मला शंका आहे. त्यांनी माझ्या शेवटच्या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे. संबंधित खात्याने दिलेल्या उत्तरात ‘महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमन १९८१ सुधारित २०२१ नुसार रत्नागिरीत ९ व सिंधुदुर्गात १९ परराज्यातील नौका’ असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे परराज्यात असल्याचा अर्थ निघतो. या उत्तरात तातडीने सुधारणा करावी, असे त्यांनी सांगितले.
तसेच परराज्यातील बोटी कोकणातील समुद्रात येऊन मासेमारी करतात, हा गंभीर चिंतेचा विषय आहे. सध्या गस्तीसाठी केंद्राच्या ४ आणि राज्याच्या ४ अशा एकूण ८ स्पीड बोटी उपलब्ध आहेत; मात्र सद्यस्थितीत त्या सर्व बंद आहेत. बाहेरील बोटी ४०० ते ५०० हॉर्सपॉवर क्षमतेच्या असल्याने त्यांना पकडणे कठीण जाते. त्यामुळे केंद्र व राज्याच्या सर्व गस्ती बोटी तातडीने कार्यान्वित कराव्यात, अशी मागणीही जाधव यांनी केली.
यानंतर मंत्री नीतेश राणे यांनी उत्तर देताना सांगितले की, चिडण्याचा आणि या प्रश्नाचा काहीही संबंध नाही. सर्वच गोष्टी २०१४ पूर्वीच्या होत्या, असे सातत्याने सांगणे योग्य नाही. परराज्यातील बोटी येऊन आपले मासे घेऊन जातात, हे खरे आहे. आपल्या गस्ती नौका लाकडी असून परराज्यातील बोटधारकांकडे शस्त्रेही असतात आणि ते हल्ले करतात. त्यामुळे सरकार १५ स्टीलच्या गस्ती नौका मागवत असून या प्रकरणावर ड्रोनद्वारेही लक्ष ठेवले जाणार आहे. माझ्या खात्यातील १०० टक्के अधिकारी प्रामाणिक आहेत, असेही नाही, असे स्पष्ट मत नीतेश राणे यांनी व्यक्त केले.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर