संगमेश्वर- महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र जी चव्हाण लोकसभा प्रवास अभियानाचे प्रमुख प्रमोद जठार भारतीय जनता पार्टी कोकण संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष राजेश जी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आज भारतीय जनता पाटीच्या संगमेश्वर उत्तर मंडलाची कार्यकारिणी तालुका अध्यक्ष विनोद म्हस्के यांनी जाहीर केली. दोन महिला उपाध्यक्षांसह ७ उपाध्यक्ष, ३ सरचिटणीस, ६ चिटणीस, १ कोषाध्यक्ष या प्रमुख सदस्यांसह एकूण ६० जणांची भव्य कार्यकारिणी म्हस्के यांनी आज जाहीर केली.
धामापूर, कडवई, कसबा हे तीन जिल्हा परिषद गट आणि नावडी पंचायत समिती गणाचा भाजपाच्या उत्तर संगमेश्वर मंडलात समावेश होतो. या प्रत्येक भागाला योग्य न्याय देताना सर्व समाजातील योग्य व्यक्तींचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. उत्तर संगमेश्वर मंडलाच्या सरचिटणीस पदावर डॉ. अमित ताठरे, मिथुन निकम आणि सतीश पटेल यांची निवड झाली आहे. महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी सौ. शीतल दिंडे (आंबव पोंक्षे) यांची तर मंडलाच्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी स्वप्नील संजय (बापू) सुर्वे (आंबेड खुर्द) यांची निवड करण्यात आली आहे. संगमेश्वर शहर अध्यक्ष म्हणून अनुप प्रसादे यांची निवड करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीच्या विविध मोर्चांच्या अध्यक्षपदांवरही अनुभवी, तज्ज्ञ कार्यकर्त्यांची निवड झाल्यामुळे भविष्यात संगमेश्वर तालुक्यात भाजपा आपली पाळेमुळे खोलवर रुजवून भरारी घेण्याच्या तयारीत असल्याचे सकृतदर्शनी तरी निदर्शनास येत आहे.