मुंबई : तडीपार करण्यात आलेला आरोपी पुन्हा भांडुपमध्ये आल्याचे समजताच भांडुप पोलिसांनी बारमध्ये छापा टाकला. यावेळी या तडीपार आरोपीसोबत पोलिसांच्या रेकॉर्डवरील आणखी दोन आरोपी बसले होते. तडीपार आरोपीला पकडताच इतर दोघांनी त्यास विरोध केला. पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी बारमधील टेबलावर असलेला सॉस पोलिसांच्या तोंडावर फेकण्यात आला. दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले; मात्र तडीपार आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.
मुंबई पोलिसांच्या वतीने तडीपार, फरार आरोपी पकडण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येते. भांडुप पोलिसदेखील याबाबत आढावा घेत असताना तडीपार आरोपी हर्षद काळे याचा भांडुप परिसरात वावर पुन्हा वाढल्याचे कळले. त्याच्याबाबत अधिक महिती मिळवत असताना १३ फेब्रुवारीला तो गुरुदेव बारमध्ये मित्रांसोबत दारू पिण्यासाठी बसला असल्याचे समजले. भांडुप पोलिसांचे पथक या ठिकाणी पोहोचले तेव्हा हर्षद याच्यासोबत रेकॉर्डवरील आरोपी संतोष जाधव आणि अनिकेत कांबळे हे दोघेही तिथे होते. पोलिस हर्षदला पकडण्यासाठी पुढे जाताच जाधव आणि कांबळे यांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तावडीतून निसटण्यासाठी काळे याने त्यांच्या चेहऱ्यावर टोमॅटो सॉस फेकला. त्यानंतर तिघांनीही बारमधून पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या पथकाने काळे याला पकडले; मात्र जाधव आणि कांबळे निसटले.
पोलिस उपायुक्तांनी हर्षद काळे याला सप्टेंबर २०२२मध्ये मुंबई आणि ठाण्यातून तडीपार केले होते. त्यामुळे सरकारी आदेशाचे उल्लंघन आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भांडुप पोलिसांनी हर्षद काळे, संतोष जाधव आणि अनिकेत कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जाहिरात :