
जनशक्तीचा दबाव न्यूज | भांबेड | एप्रिल ०२, २०२३.
भांबेड जिल्हा परिषद गटामध्ये महाअर्थसंकल्प २०२३ व आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख स्थानिक कार्यकर्त्यांची सभा संपन्न झाली. भाजपा उद्योग आघाडी, महिला समिती कोकण विभाग सहप्रमुख सौ. उल्का विश्वासराव, लांजा भाजपा तालुकाध्यक्ष श्री. महेश ऊर्फ मुन्ना खामकर, जिल्हा सरचिटणीस वसंत वाकडे, ओबीसी आघाडीचे तालुकाध्यक्ष श्री. दादा भिडे, तालुका उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत मांडवकर, माजी जि.प. सदस्य श्री. अमोल रेडीज, कार्यकारिणी सदस्य श्री. श्रीकांतदादा ठाकूर, जि.प. सहसचिव श्री. महेश गांगण, सर्व बूथ अध्यक्ष, शक्तीकेंद्र प्रमुख, व अन्य प्रमुख पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते.
बूथ सक्षमीकरण हा विषय मध्यवर्ती ठेऊन त्यावर विशेष चर्चा करण्यात आली. बूथच्या जबाबदाऱ्यांचे स्वरूप, केंद्र व प्रदेशातून आलेल्या कार्यक्रमांचे परिचालन, कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांना मिळवून देऊन पक्षाचे अंत्योदयाचे ध्येय पूर्ण करण्यासाठी स्वयंस्फुर्तीने झटणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणे आदी विषयांबाबत सौ. उल्का विश्वासराव यांनी मार्गदर्शन केले. “अशाप्रकारे समाजकार्य करत असताना आगामी निवडणुकांमध्ये बूथरचना पक्ष व कार्यकर्ते या दोन्हींच्या हिताची ठरेल. निवडणुकांकडे राजकीय दृष्टीकोनातून पहा.” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. आगामी काळात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समाज माध्यमांचा मुक्तपणे वापर करून आपले व पक्षाचे विचार आणि कार्य समाजमनावर बिंबवणे गरजेचे असल्याचे मत राजापूर-लांजा-साखरपा विधानसभेचे सोशल मिडिया संयोजक श्री. अमित केतकर यांनी व्यक्त केले.
“भांबेड जि. प. गटात महाअर्थसंकल्पाच्या माध्यमातून विकासकामांसाठी युती सरकारने भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. तब्बल साडेतेरा कोटी रूपये निधी पूर्व लांजामध्ये पूल व रस्त्यांसाठी आणण्यात आपण यशस्वी ठरलो असून आपण या गोष्टींचा प्रचार घराघरापर्यंत जाऊन करण्याची गरज आहे. आपल्या विरोधकांनी नेहमीप्रमाणे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र काही कार्यकर्त्यांनी त्यांना रोखठोक प्रत्युत्तरसुद्धा दिले आहे. त्यांचे यावेळी आवर्जून अभिनंदन करते. आपल्यापैकी अनेकांनी अशा भूमिकेत स्वतः सहभाग घेतल्यास पुढील काळात कोणताही विरोधक आपल्या कामांचे श्रेय लाटण्याचा फाजील प्रयत्न करणार नाही. जाणीवपूर्वक वेळच्यावेळी विविध आघाड्यांवर स्वतः लढलो तरच निवडणुकांच्या धामधुमीत आपण अपेक्षित यश संपादन करू शकतो.” असे त्या म्हणाल्या. यानंतर श्री. कमलाकर शिवगण व श्री. सचिन शिवगण यांना नियुक्त्या घोषित करण्यात आल्या. याशिवाय उपस्थित पदाधिकाऱ्यांना विविध जबाबदाऱ्या देऊन त्यांचे नियमन करण्यात आले. आणि अशा स्वरुपात येऊ घातलेल्या प्रत्येक निवडणुकीसाठी जबाबदार कार्यकर्त्यांची एक नवी टीम तयार करण्यात आली. महिला, युवक, युवती आणि प्रत्येक समाजातील प्रभावी घटक या टीममध्ये असल्याने या बैठकीच्या अंति सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अंत्योदय कार्यक्रम राबवून भांबेड जि.प. गटात भाजपचा विजयी झेंडा उभारण्याचा संकल्प केला. बैठकीनंतर भाजपा जनसंपर्क कार्यालय भांबेडसमोर माजी खासदार राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. “राहुल गांधींनी केलेले वक्तव्य अत्यंत निंदनीय असून भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात असे मनोविकृत लोकप्रतिनिधी देशाची प्रतिमा मलीन करत आहेत.” असेही सौ. विश्वासराव म्हणाल्या.