
संगमेश्वर: गरीब रथ एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीची संगमेश्वर रेल्वे स्टेशनजवळ सुमारे ३५ हजार रुपयांची बॅग चोरीला गेली. ही घटना ९ मे रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबतची फिर्याद संद्रा सिरियक (वय २२, रा. केरळ) यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली. त्या शिक्षणानिमित्त पनवेल येथे जात होत्या. ८ मे रोजी त्या एर्नाकुलम रेल्वे स्टेशनवरून गरीब रथ एक्सप्रेसमधून जात असताना रात्री सुमारे ९.३० वाजता उडपी रेल्वे स्टेशनजवळ त्यांना झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ मे रोजी सुमारे ७ वाजता संगमेश्वर रेल्वे स्टेशनजवळ त्यांना जाग आली असता खिडकीजवळ ठेवलेली काळ्या रंगाची बॅग चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.
चोरी झालेल्या बॅगमध्ये ३० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, ५ हजार रुपये रोख आणि आधारकार्ड व ड्रायव्हिंग लायसन्स या महत्त्वाच्या कागदपत्रांचा समावेश होता. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.