कलाकृतीचे सौंदर्य कलाकाराच्या नजरेसह जादुई कुंचल्यात ! – कलाकार प्रणय फराटे , पन्हाळा परिसराचे निसर्ग सौंदर्य,राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा…

Spread the love

जे डी पराडकर/संगमेश्वर- निसर्ग , जसा कलाकाराला दिसतो तसाच तो सर्वांना दिसतो असं नाही. निसर्ग दृश्य समोर दिसत आहे त्यापेक्षा ते अधिक सौंदर्यवान बनवण्याची ताकद कलाकाराच्या नजरेत, त्याच्या बोटासह जादुई कुंचल्यात असते.   एखादा सामान्य विषय देखील कलाकाराच्या कुंचल्यातून सर्वांचे लक्ष वेधून घेतो. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषद आयोजीत भव्य राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील युवा निसर्ग चित्रकार प्रणय फराटे याने एक जबरदस्त कलाकृती साकारून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. फराटे याची कलाकृती म्हणजे, कलाकाराच्या नजरेतील आणि बोटांसह जादुई कुंचल्यातील खरी ताकद म्हणून ओळखली जात आहे.


मराठा लष्करी स्थापत्यशृंखला अंतर्गत ” किल्ले पन्हाळा ” चे जागतिक वारसा स्थळ नामांकनच्या अनुषंगाने पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषद पन्हाळा तर्फे २२ सप्टेंबर रोजी भव्य राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी किल्ले पन्हाळा, किल्ले पन्हाळा वरील ऐतिहासिक वास्तू व निसर्ग असे विषय ठेवण्यात आले होते. या स्पर्धेसाठी राज्यातील ३५० पेक्षा अधिक कलाकारांनी सहभाग घेतला होता. रत्नागिरी जिल्ह्यातून सहभागी झालेल्या कलाकारांमध्ये ‘ सह्याद्री कला महाविद्यालय सावर्डे ‘ येथे रंग आणि रेखा कलेचे शिक्षण घेतलेल्या युवा निसर्ग चित्रकार प्रणय फराटेचा समावेश होता.

प्रणय फराटे हा युवा चित्रकार मंडणगड येथील वलवते गावचा. तो एक प्रयोगशील निसर्ग चित्रकार म्हणून ओळखला जातो. सह्याद्री कला महाविद्यालयात कलेचे शिक्षण घेत असताना त्याने अनेक राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत भाग घेऊन आपल्या कलाकृतीची मोहर कला रसिकांच्या मनावर उमटवली होती. दररोज किमान एक तरी निसर्ग दृश्य, निसर्गाच्या सानिध्यात जाऊन रेखाटण्याची त्याची मनीषा असते. यामुळे आजवर त्याने एकापेक्षा एक सुंदर अशी शेकडो निसर्ग दृश्य साकारली आहेत. याबरोबरच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात जेथे मोठ्या संरक्षक भिंती आहेत, त्या भिंतीवर कोकणच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारी विविध दृश्य युवा चित्रकार प्रणय फराटे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी साकारली आहेत.

पन्हाळा येथील राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर अनेक कलाकार किल्ला परिसरातील विशिष्ट ठिकाणी २५ ते ३० च्या संख्येने गर्दी करून दृश्य रेखाटताना पाहून, युवा निसर्ग चित्रकार प्रणय फराटेने आपण काहीतरी वेगळं रेखाटलं पाहिजे असं ठरवलं. पन्हाळा किल्ला परिसर फिरत असताना एका बाजूला गरीब कुटुंबाची काहीशी मोडकळीस आलेली झोपडी फराटे याच्या दृष्टीस पडली. याच क्षणी त्याच्यातील कलाकार जागा झाला आणि त्याच्या नजरे समोर या झोपडीतील कष्टकरी माणसांचे जीवन,  झोपडी आहे त्या स्थितीत सुरक्षित राहावी, यासाठी त्या कुटुंबाची सुरू असणारी धडपड, झोपडीतही आनंदी असणारे या कुटुंबाचे चेहरे, सारं काही क्षणार्धात तरळू लागलं. युवा निसर्ग चित्रकार प्रणय फराटे हा देखील अत्यंत गरीबीतून कलाशिक्षण घेऊन आपली प्रगती करत आहे.  असे जीवन जो स्वतः जगला आहे, त्यामुळे तोच यातील साऱ्या अडचणी समजू शकतो अशी स्थिती असल्याने या झोपडीसमोर बसून त्याने सर्वप्रथम ही झोपडी आणि सारा परिसर अत्यंत बारकाईने आपल्या नजरेने टिपून घेतला. त्यानंतर दोन तासांच्या अथक परिश्रमातून फराटे याने झोपडीचे सुंदर असे दृश्य साकारले. हिरव्या रंगाच्या शेडनेटमध्ये उभे केलेले न्हाणी घर देखील या कलाकाराच्या नजरेतून सुटले नाही. स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर प्रणय फराटे याने रेखाटलेल्या या झोपडीच्या कलाकृतीची कलाकारांमध्ये चर्चा सुरू होती.

“स्पर्धेतून बाहेर पडण्याची भीती नव्हती”

*पन्हाळा गिरीस्थान नगर परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय भव्य चित्रकला स्पर्धेत पन्हाळा किल्ला आणि परिसर हा चित्रांचा मुख्य विषय होता. मला किल्ला परिसरात एका बाजूला आडवाटेवर असणाऱ्या या झोपडीत गरीब कुटुंबाची श्रीमंती नजरेस पडली. राज्यातून आलेले नामवंत कलाकार किल्ला, बुरुज , धान्य कोठार यांचे रेखाटन करत असताना, आपण काहीतरी वेगळंच चितारत आहोत हे लक्षात येत होतं. एक वेळ  स्पर्धेतून बाहेर पडलो तरी हरकत नाही, पण मनाला भावलेल्या या झोपडीतील सौंदर्याची श्रीमंती आपल्या चित्रातून दाखवण्याचे मी ठामपणे ठरवलं होतं. आपल्या आजवरच्या कला प्रवासात ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के, सह्याद्री कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले असल्याने, मी कला प्रवासात नेहमीच वेगळी वाट चालण्याचा निर्णय घेत असतो. – प्रणय फराटे , युवा निसर्ग चित्रकार

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page