मुंबई- कर्नाटकमध्ये काल संध्याकाळी कॉग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून राहुल गांधी यांचा भारत जोडो यात्रेतील एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला.या ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी यांचे चालतानाचे व्हिज्युअल्स घेऊन त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित गाणे टाकण्यात आले आहे. याच व्हिडिओवरून भाजपने काँग्रेसवर टीकेची झोड उठवली असून हा व्हिडिओ लवकरात लवकर डिलीट करण्याची मागणी देखील लावून धरली आहे.
आज सकाळी भाजपच्या मुंबईतील पक्ष कार्यालयात भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत, काँग्रेसने संबंधित व्हिडिओ डिलीट करावा व माफी मागावी, अशी मागणी केली आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्यासोबत राहुल गांधी यांचे तुलना केल्याचे बोलत चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचा निषेध नोंदवला.
येत्या दोन दिवसात काँग्रेसने संबंधित व्हिडिओ डिलीट केला नाही, तर अधिक आक्रमकपणे आम्ही विरोध करू, असं देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान या व्हिडिओवरून सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये जुंपली असून नेते एकमेकांवर टीकास्त्र डागत आहेत.