
राजापूरः ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या ताफ्याला बारसू गावात जाण्यापासून रोखण्यात आले. त्यानंतर भास्कर जाधव हे संतापलेले व रस्ता तुमच्या मालकीचा आहे का? असा थेट प्रश्न विचारत भास्कर जाधव यांनी आपला राग व्यक्त केला. माझ्याशी अशा अहंकाराच्या भाषेत बोलू नका, असेही यावेळी जाधव यांच्याकडून पोलिसांकडून सांगण्यात आले.
उद्धव ठाकरे हे बारसूमध्ये जाणार त्यामुळे भास्कर जाधव हे सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सहित बारसू येथे दाखल झाले. पण यावेळी पोलिसांनी त्यांची गाडी आत सोडल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीला आत सोडण्यापासून रोखले. यानंतर संतापलेल्या भास्कर जाधव यांनी पोलिसांची कानउघाडणी केली. तसेच सत्ताधाऱ्यांवर देखील निशाणा साधला.
बारसू येथे पोलिसांनी भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांची गाडी रोखल्यानंतर त्यांच्यामध्ये आणि पोलिसांमध्ये वाद झाला. यावेळी भास्कर जाधव पोलिसांवर संतापत म्हणाले की, कारण नसताना गाड्या का थांबवल्या असे जाधव यांनी विचारताच परवानगी घेऊन या असे उत्तर पोलिसांकडून देण्यात आले. तर कारण नाही, अशी भाषा माझ्यासोबत नका वापरू. तुम्हाला गाड्या आत न सोडण्यासाठी पोलिसांनी काय लिहून दिले आहे ते दाखवा. तुमची या ठिकाणी नेमणूक आहे म्हणून तुमच्यासोबत बोलत आहे नाही तर तुमच्याशी बोलण्याची गरज काय होती, असे जाधवांनी पोलिसांना सुनावले. घमेंडी आणि दादागिरीमध्ये बोलण्यापेक्षा सौजन्याने बोला, असेही यावेळी जाधव यांनी पोलिसांना सांगितले.