रत्नागिरीतील आमच्या सारख्या अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घडवण्यात बापूसाहेब परुळेकरांचे मोठे योगदान- माजी आमदार बाळ माने

Spread the love


रत्नागिरी भाजपाच्या सुवर्णयुगाची पायाभरणी करणाऱ्या महानुभावांपैकी एक माजी खासदार चंद्रकांत तथा ॲड. बापूसाहेब परूळेकर यांच्या निधनाची वार्ता अत्यंत क्लेशदायक आहे. रत्नागिरीतील आमच्या सारख्या अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घडवण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. १९७७ साली जनसंघाच्या माध्यमातून तर १९८० मध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांनी रत्नागिरी लोकसभेचे संसदेत प्रतिनिधित्व केले. उत्कृष्ट संसदपटू, निष्णात कायदेपंडित अशी त्यांची ओळख होती.
▪️आक्रमक वक्तृत्त्व, संयमी आणि दूरगामी नेतृत्त्व तसेच विकासात्मक दृष्टीकोन यांमुळे रत्नागिरीतील जनसामान्यांनी त्यांचे नेतृत्त्व आनंदाने स्विकारले होते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या काळात संयुक्त महाराष्ट्र समितीच्या आंदोलनादरम्यान त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा मिसा अंतर्गत त्यांना तब्बल १६ महिने तुरुंगवास सोसावा लागला होता. १९६०-७० च्या दशकात रत्नागिरी जनसंघाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. त्यांच्या या काळातील संघटनात्मक कार्यामुळे रत्नागिरीतील जनतेच्या मनात भारतीय जनता पक्षाच्या ध्येयधोरणांप्रति आजही नितांत आदर आहे.
▪️जनसंघाचे पहिले खासदार स्वर्गीय प्रेमजीभाई असर यांच्या काळापासून काम करणाऱ्या बापूसाहेबांना पुढे रत्नागिरीत मा. आमदार कै. डॉ. तात्यासाहेब नातू, मा. आमदार कै. आप्पासाहेब गोगटे, रत्नागिरीच्या मा. आमदार कै. कुसुमताई अभ्यंकर, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व रत्नागिरी पं.स. सभापती कै. यशवंतराव माने, कै. जनुभाऊ काळे यांची साथ लाभली. त्यामुळे रत्नागिरीत भाजपाचा कायम वरचष्मा राहिला होता. अत्यंत निस्वार्थी, विनम्र आणि प्रेमळ असलेले बापूसाहेब आमचे राजकीय जीवनातील आदर्श आहेत. पितृतुल्य बापूसाहेबांच्या निधनाने आदर्श योद्धा हरपल्याची भावना निर्माण झाली आहे.
▪️बापूसाहेबांच्या पवित्र आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
ॐ शांति!!!


बाळ माने ,माजी आमदार

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page