*विश्वचषक 2024 च्या 44 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशचा 28 धावांनी पराभव केला. दोन्ही संघांचा सुपर-8 टप्प्यातील हा पहिलाच सामना होता.*
टी-20 विश्वचषक 2024 च्या 44 व्या सामन्यात बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 विकेट गमावत 140 धावा केल्या. पॅट कमिन्सची हॅट्ट्रिक आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची दमदार कामगिरी याशिवाय बांगलादेश संघाचा कर्णधार नजमुल शांतोनं दिलेली कडवी झुंज यामुळं हा सामना रोमांचक झाला. बांगलादेशनं दिलेल्या 141 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियच्या फलंदाजांनी स्फोटक खेळी केली. पण पावसामुळं दोनवेळा सामना थांबवावा लागला. 6.2 षटकांनंतर पावसामुळं खेळ थांबला. तेव्हा ऑस्ट्रेलियानं एकही विकेट न गमावता 64 धावा केल्या होत्या. डकवर्थ लुईस नियमानुसार यावेळी बरोबरीचा स्कोअर 35/0 होता. मात्र यात ऑस्ट्रेलियचा संघ बराच पुढं होता. पाऊस सुरूच राहिला असता तर ऑस्ट्रेलियाच्या विजयावर तेव्हाच शिक्कामोर्तब झाला असता.
*ऑस्ट्रेलियानं 28 धावांनी जिंकला सामना :* पावसानंतर पुन्हा सामना सुरू होताच ऑस्ट्रेलियाला पहिला झटका बसला. रिशाद हुसेननं ट्रॅव्हिस हेडला बोल्ड केलं. 21 चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीनं त्याने 31 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला नवव्या षटकात कर्णधार मिचेल मार्शच्या रूपात दुसरा झटका बसला. 11.2 षटकापर्यंत खेळ पोहोचला असता पावसाच्या व्यत्ययामुळं सामना पुन्हा थांबला. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 2 बाद 100 होती त्यामुळं ऑस्ट्रेलियाचा संघ डकवर्थ लुईस नियमानुसार 28 धावांनी पुढं होता. पाऊस कायम राहिल्यामुळं अखेर डकवर्थ लुईस या नियमानुसार, ऑस्ट्रेलियानं 28 धावांनी सामना आपल्या नावावर केला. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनं 35 चेंडूत 53 धावांची नाबाद खेळी केली, तर ट्रॅव्हिस हेडनं 31 धावा केल्या. बांगलादेशकडून रिशाद हुसेननं 23 धावांत 2 विकेट घेतले.
*बांगलादेशची खराब फलंदाजी :* बांगलादेशनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 विकेट गमावत 140 धावा केल्या. संघाकडून कर्णधार नझमुल हुसेन शांतोनं 36 चेंडूंत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं सर्वाधिक 41 धावा केल्या. बांगलादेशच्या फलंदाजांना डावाच्या सुरुवातीपासूनच धावा करता आल्या नाहीत. संघासाठी लिटन दास आणि कर्णधार नझमुल हुसेन शांतो यांनी दुसऱ्या विकेटसाठी 58 धावांची (48 चेंडू) भागीदारी केली. मात्र, त्यानंतर संघानं सातत्यानं विकेट गमावल्या आहेत. त्यामुळं त्यांना चांगली धावसंख्या उभारता आली नाही.
*पॅट कमिन्सनंची हॅट्ट्रिक :* ऑस्ट्रेलियासाठी पॅट कमिन्सनं गोलंदाजीत अप्रतिम कामगिरी केली ज्यात त्यानं 4 षटकात 29 धावा देत 3 विकेट घेतले आणि हॅटट्रिक देखील घेतली. कमिन्स टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात हॅट्ट्रिक घेणारा 7वा गोलंदाज ठरला आहे. याशिवाय ॲडम झाम्पानं 2 विकेट घेतले. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी विश्वचषकातील आपला दबदबा कायम राखलाय.
T20 विश्वचषकाच्या इतिहासात हॅट्ट्रिक घेणारे खेळाडू
ब्रेट ली – विरुद्ध बांगलादेश (केप टाउन, 2007)
कुर्तिस कॅम्फर – विरुद्ध नेदरलँड्स (अबू धाबी, 2021)
वानिंदू हसरंगा – विरुद्ध दक्षिण आफ्रिका (शारजाह, 2021)
कागिसो रबाडा – विरुद्ध इंग्लंड (शारजाह, 2021)
कार्तिक मयप्पन – विरुद्ध श्रीलंका (गीलॉन्ग, 2022)
जोशुआ लिटल – वि न्यूझीलंड (ॲडलेड, 2022)
पॅट कमिन्स – विरुद्ध बांगलादेश (अँटिगा, 2024)
*ऑस्ट्रेलियाची कामगिरी :* विश्वचषक 2024 स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यांनी ग्रुप स्टेजमधील चारही सामने जिंकले आहेत. ग्रुप स्टेजमध्ये ऑस्ट्रेलियानं ओमान, नामिबिया आणि स्कॉटलंड तसेच इंग्लंड या संघांना पराभूत केलं होतं.
*बांगलादेशची कामगिरी :* टी-20 विश्वचषकापूर्वी बांगलादेशनं यूएसए विरुद्धची टी-20 मालिका गमावली होती, परंतु सध्याच्या स्पर्धेत त्यांची आतापर्यंतची कामगिरी चांगली आहे. श्रीलंका, नेदरलँड आणि नेपाळचा पराभव करणाऱ्या बांगलादेशला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावं लागलं. विशेष म्हणजे 114 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांना हा पराभव पत्करावा लागला.