वेस्ट इंडिज आणि बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेत सध्या यजमान संघ 1-0 नं पुढं आहे.
किंगस्टन : वेस्ट इंडिज क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा कसोटी सामना 30 नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना जमैकाच्या किंगस्टन येथील सबिना पार्क इथं खेळवला जाणार आहे.
पहिल्या कसोटीत काय झालं
पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजनं बांगलादेशचा 201 धावांनी पराभव केला. यासह यजमान वेस्ट इंडिजनं दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात बांगलादेशला हरवून मालिका काबीज करण्याच्या इराद्यानं वेस्ट इंडिजचा संघ मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे, बांगलादेशचा संघ दुसरी कसोटी जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी करण्याकडे लक्ष देईल. मात्र, पाहुण्या संघासाठी ते तितकं सोपं नसेल. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.
खेळपट्टी कशी असेल
सबिना पार्कची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. पण नवीन चेंडू सुरुवातीच्या काळात वेगवान गोलंदाजांना मदत करेल अशी अपेक्षा आहे. मात्र, जसजसा खेळ पुढं जाईल तसतसे फिरकीपटूंनाही खेळपट्टीवरुन काही आधार मिळेल, जो खेळात महत्त्वाची भूमिका बजावू शकेल. पहिल्या डावाची सरासरी 317 धावा आहे. या मैदानावर फलंदाज मोठे डाव खेळू शकतात हे यावरुन दिसून येते. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो आणि बोर्डवर मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करु शकतो. मात्र, चांगल्या फलंदाजीमुळं पाठलाग करणं हाही चांगला निर्णय असेल.
सबिना पार्क येथील कसोटी सामन्यांची आकडेवारी कशी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सबिना पार्कवर आतापर्यंत एकूण 55 कसोटी सामने खेळले गेले आहेत. ज्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं 18 सामने जिंकले आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघानं 22 सामने जिंकले आहेत.
दोन्ही संघाचे हेड-टू-हेड रेकॉर्ड काय
वेस्ट इंडिज आणि बांगलादेशचे संघांनी आतापर्यंत एकूण 21 वेळा कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात वेस्ट इंडिजचा वरचष्मा दिसत आहे. वेस्ट इंडिजनं 21 पैकी 15 सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशनं केवळ 4 सामने जिंकले आहेत. याशिवाय दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. याशिवाय वेस्ट इंडिजनं 21 पैकी 8 सामने मायदेशात आणि 7 सामने घराबाहेर जिंकले आहेत. तर बांगलादेशनं मायदेशात दोन सामने आणि घराबाहेर दोन सामने जिंकले आहेत.
वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यातील कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यातील कसोटीत वेस्ट इंडिजच्या क्रेग ब्रॅथवेटनं सर्वाधिक धावा केल्या आहेत. क्रेग ब्रॅथवेटनं बांगलादेशविरुद्ध 13 सामन्यांच्या 25 डावांमध्ये 43.21 च्या सरासरीनं 994 धावा केल्या आहेत. या कालावधीत क्रेग ब्रॅथवेटनं 3 शतके आणि 5 अर्धशतकं झळकावली असून 212 धावा ही सर्वोत्तम धावसंख्या आहे.
वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यातील कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज
वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजच्या केमार रोचनं सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. केमार रोचनं बांगलादेशविरुद्धच्या 12 सामन्यांच्या 22 डावांमध्ये 20.10 च्या सरासरीनं आणि 2.85 च्या इकॉनॉमीनं 48 विकेट घेतल्या आहेत.
वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कधी आणि कुठं खेळली जाईल?
वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना शनिवार, 30 नोव्हेंबरपासून जमैकाच्या किंगस्टन येथील सबिना पार्क इथं भारतीय वेळेनुसार रात्री 8:30 वाजता खेळवला जाईल.
वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कुठं आणि कसा पाहायचा?
सध्या भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनेलवर वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या प्रसारणाबाबत कोणतीही माहिती नाही. तथापि, वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेचं लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर भारतात उपलब्ध असेल.
दोन्ही संघांची प्लेइंग 11 :
▪️वेस्ट इंडिज : क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), मिकाईल लुईस, ॲलेक अथानाझ, केसी कार्टी, जोशुआ डी सिल्वा (यष्टिरक्षक), जस्टिन ग्रीव्हज, कावेम हॉज, अल्झारी जोसेफ, शमर जोसेफ, केमार रोच, जेडेन सील्स.
▪️बांगलादेश : महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, मोमिनुल हक, शहादत हुसेन दिपू, लिटन दास (यष्टिरक्षक), जाकेर अली, तैजुल इस्लाम, तस्किन अहमद, मेहदी हसन मिराज (कर्णधार), हसन महमूद, शोरीफुल इस्लाम.