बाळू नानांच्या रूपाने मोडी लिपी चा जाणकार हरपला…!
७/१२ चा खोलवर अभ्यास असणाऱ्या असामीने ७/१२ तारखेलाच जगाचा निरोप घेतला..

*देवरुख/दि ८ डिसेंबर-* देवरूखातील जुन्या काळातील मोडीलिपीचे अभ्यासक व जाणकार आत्माराम (बाळु नाना) यशवंत बोंद्रे ह्यांचे दि.०७ डिसेंबर २०२५ रोजी पुणे येथे वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
पांढरा शर्ट – लेंगा, तोंडात साधी सुपारी, डोळ्यात आशावादी प्रेमळ भाव, हसरा चेहरा, मृदू शब्द, मनमिळाऊ स्वभाव, बोलण्याची तसेच माणसं जोडायची प्रचंड आवड, महसूल विभागाच्या कार्य प्रणालीची पूर्ण जाण असलेले मोडी लिपीचे अभ्यासक असलेले नाना या टोपन नावाने ओळखले जात होते.
पूर्वीच्या काळात तलाठी म्हणून काम करत होते. नोकरीत असून ही मुळ गाव देवघर व देवरूखातील शेतीची कष्टाची कामे, परिवाराच्या उदरनिर्वाहा साठी जोड म्हणून विमा, पोस्ट तसेच लॉटरी तिकिटांची एजन्सी, केस गळतीवर अभ्यास करून स्वत: तयार केलेलं तेल, शिकेकाई, घरची गावठी हळद व तिखट पावडर, घरच्या शेतात काबाडकष्ट करून काढलेल्या विविध भाज्या वगैरे मध्ये गुंतून अगदी ख-या अर्थाने अविरत कष्ट करीत राहिलेली ही व्यक्ती!
आपल्या जिल्ह्यातील गावांत त्यांचा एवढा प्रचंड जनसंपर्क होता की गावातील वेगवेगळ्या घराण्यांतील व्यक्तींची एकंदरीत वंशावळच त्यांना ज्ञात असायची.
१९५० पासून पहिली काही वर्षे प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी नंतर जुन्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यापासून अगदी सावंतवाडी पर्यंत जवळपास ७५ गावांत तलाठी म्हणून नोकरी करून ते सेवानिवृत्त झाले.
बाळूनाना बोंद्रेचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध मोडी लिपी जाणकार होते. त्यांनी मोडी लिपीतील हजारो कागदपत्रांचे मराठीत (बाळबोध) लिप्यंतर करुन असंख्य लोकांना मदत केली. त्यांच्या ह्या कामामुळे जुन्या अभिलेखातील नोंदींचा नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होत असे.
जुन्या अभिलेखातील आकारफोड पत्रक, बोटखत, जन्म मृत्यू नोंद, शाळेचे जुने दाखले वगैरे मोडी लिपीतील नोंदी केल्या गेल्या आहेत. त्या मराठीत करून दिल्याने जातीचे दाखले मिळण्यासाठी, वंशावळ शोधण्यासाठी, जमिनीचे सातबारा मध्ये नावे दाखल करण्याच्या कामी नागरिकांना शासकीय कार्यालये, न्यायालय इत्यादी ठिकाणी पुरावा म्हणून वापर करता आला.२५० वर्षापेक्षाही काही जुन्या मोडी दस्त ऐवजांचे मराठीत लिप्यंतर करण्याचे भाग्य त्यांना लाभले.
जुन्या पठडीतील मांडणी, काटकसर, अचूकतेचा आग्रह, मोत्यासारखे अक्षर, जुन्या शब्दांचे अर्थ उलगडून सांगण्याची खासियत त्यांच्याकडे होती.
.
त्यांना विशेष कलेचा गर्व कधीच नव्हता, आज वरील सारं कार्य सेवाभाव.ह्याच वृत्तीतून केले. व लोकांना मदत व्हावी, पिढ्यापिढ्यांचे प्रश्न सुटावेत असे काम त्यांनी करून दिले.
जनमानसांच्या जमिनींचे ७/१२ आयुष्यभर काढून देता देता अशी ही असामी ७/१२ तारखेलाच आपल्यातून निघून गेला.
त्यांचेवर पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचे पश्चात दोन मुलगे व दोन मुली. सुना. नातवंड असा परिवार आहे..
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*