बुलढाणा– राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे सुरू करण्यात आलेला बुलढाण्यातल्या खामगाव येथील ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ हा गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र दिनी १ मे रोजी आमदार आकाश फुंडकर यांच्या हस्ते या दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले होते. सकाळी दहा ते संध्याकाळी दहा या वेळेत दवाखाना सुरू राहणार असल्याची हमी देखील यावेळी देण्यात आली होती.
मात्र, या ठिकाणी दवाखाना हा अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार दोन ते सहापर्यंत सुरू असतो. ज्यावेळी प्रत्यक्षदर्शीने त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता दवाखाना हा बंद असलेल्या स्थितीत दिसून आला.याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ‘जिल्हास्तरावरून डॉक्टर व स्टाफ नर्स यांची कमतरता असल्यामुळे दवाखाना सुरू करण्यात आला नाही. मात्र, अजून दहा ते पंधरा दिवसांनी डॉक्टर व नर्स यांची पूर्तता करून दवाखाना सुरू करण्यात येणार आहे’.त्यामुळे गाजावाजा करून लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र दिसून येत आहे.