रत्नागिरी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम बजेटमध्ये महत्वाच्या घोषणा केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपा सरकारने महिला, गरीब, शेतकरी, आशासेविका, आणि सर्वसामान्यांच्या हितासाठीच्या नवीन योजना जाहीर करून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. २०४७ ला विकसित भारत होण्याकरिता या योजनांतून पाया रचला जाणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी आमदार, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळासाहेब माने यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले की, गेल्या दहा वर्षांपासून भाजपा सरकारने महिला सक्षमीकरणावर भर दिला. त्यातूनच आता तीन कोटी महिलांसाठी लखपती दीदी ही योजना जाहिर करून महिलांसाठी आणखी एक योजना आणली याचे अभिनंदन केले पाहिजे. दोन कोटी गरिबांना चांगली व माफक दरातील घरे मिळणार आहेत. 300 युनिट वीज मोफत देण्याची महत्त्वाची घोषणासुद्धा महत्त्वपूर्ण म्हणावी लागेल.
बाळासाहेब माने पुढे म्हणाले की, आशा सेविका, अंगणवाडी सेविकांना गिफ्ट आयुष्मान भारत योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेचे 40 हजार नॉर्मल रेल्वे कोच वंदे भारत ट्रेनमध्ये बदलण्यात येणार आहे. मेट्रोचे जाळे उभारण्यावर भर आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विमानतळाची संख्या दुप्पट होणार असल्याने देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
श्री. माने यांनी सांगितले की, शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्याच्याकरिता मोदी सरकारने पावले उचलली आहेत. देशातील १३६१ बाजार समित्या ई नेमशी जोडण्यात येणार आहे. येत्या पाच वर्षात त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वसामावेशक कार्यक्रम आखला जाणार आहे. पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना सरकारी मदत व पीकविम्याचे कवच देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी योजना फायदेशीर ठरणार आहे.