रत्नागिरी : आमदार उदय सामंत यांनी विधानसभा निवडणुकीबाबत काहींच्या विरोधात केलेल्या वक्तव्याची चांगलीच ऊर्जा मिळाली आहे. त्यामुळे मंजूर असलेल्या कामांबाबत मित्रपक्षातील काहीजन आंदोलन करीत आहेत. त्यांनी टाकीवरून उडी मारू नये, ते आम्हाला हवे आहेत. आमदार उदय सामंत यांच्याबाबत जाणीपूर्वक नाराजी पसरवण्याचा हा प्रयत्न आहे. या कामांचे श्रेय्य लाटण्यासाठीच भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांची धडपड सुरू आहे, असा थेट आरोप शिवसेनेचे रत्नागिरी तालुकाप्रमुख महेश उर्फ बाबू म्हाप आणि शहर प्रमुख बिपिन बंदरकर यांनी केला.
शहरातील सहकारनगर येथील गळती लागलेली टाकीचा विषय आणि कुवारबाव येथील नादुरूस्त रस्त्याच्या कामावरून महायुतीतील शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. राजेश सावंत यांनी केलेल्या आंदोलनाला शिवसेनेचे तालुकाप्रमुख आणि शहर प्रमुख यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते. यावेळी बारक्या हळदणकर, श्रद्धा हळदणकर, गणेश भारती आदी उपस्थित होते.
शहरातील सहकारनगर येथील पाण्याच्या टाकीला लागलेल्या गळतीबाबत शहरप्रमख बिपिन बंदरकर म्हणाले, शहरातील सरकारनगर येथील गळक्या टाकीचे काम करून घेण्यासाठी आमचे स्थानिक नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी सक्षम आहेत. तीन महिन्यांपूर्वीच हे काम मंजूर झाले आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार उदय सामंत यांनी त्याला 50 लाख रुपये मंजूर केले आहेत. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हे काम राहिले होते. दोन दिवसात ते सुरू होईल. परंतु याबाबत मित्र पक्षाने आमच्याशी चर्चा करायला हवी होती. हे काम मंजुर होऊन माना इलेक्ट्रीकल अॅण्ड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस या ठेकेदार कंपनीला दिले आहे. दोन दिवसात त्याचे काम सुरू होईल. तरी मंजूर झालेल्या कामाबाबत ते टाकीवर चढुन का आंदोलन करणार आहेत हे त्यांनाच विचारायला हवे. योग्य माहिती घेतली असती तर त्यांना हे सर्व करण्याची गरज भसली नसती. त्यानंतर तालुकाप्रमुख बाबू म्हाप म्हणाले, कुवारबाव येथी अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणाच्या विषय़ाचा देखील मित्र पक्ष असलेल्या भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी जाणीपूर्वक चाळवला आहे. फेब्रुवारी महिन्यातच या रस्त्याचे काही काम करून घेण्यात आले. उर्वरित काम आचरसंहितेमुळे थांबले होते. ते संपल्यानंतर पुन्हा हे काम सुरू करण्यात येईल, असे आमदार किरण सामंत यांनी देखील सांगितले होते. स्थानिक लोकांना हवा तसा रस्ता केला जाणार आहे, असेही सांगितले होते. तरी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी हा विषय उचलून धरला.
विधानसभा निवडणुकीमध्ये काहींनी विरोधात काम केलेल्याचे वक्तव्य उदय सामंत यांनी केले होते. त्यामुळे त्यांना जास्तच ऊर्जा मिळाली आहे. म्हणून ते टाकीवर चढुन आंदोलन करणार होते. परंतु त्यांनी टाकीवरून उडी मारू नये, ते आम्हाला हवे आहेत. प्रत्येकाने पक्षवाढीसाठी काम केले पाहिजे, महायुती म्हणून एवढे चांगले काम झाले असताना अशा प्रकारे वागणे योग्य नाही. मित्र पक्ष म्हणून एकत्र बसुन चर्चा करून हा विषय सुटला असता. परंतु राजेश सावंत यांना उदय सामंत यांच्याबद्धल जाणीवपूर्वक नाराजी पसरविण्यासाठी आणि मंजूर कामांचे श्रेय लाटण्यासाठी ही धडपड सुरू आहे.