अयोध्या : प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येचा शरयूकाठ प्रकाशाच्या किरणांनी न्हाऊन निघाला. विक्रमी 21 लाख पणत्या एकाचवेळी शरयूच्या तीरावरील 51 घाटांवर प्रज्वलित झाल्या आणि अवघा आसमंत उजळून निघाला. एकाचवेळी एवढ्या संख्येने दिवे लावण्याच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुकात करण्यात आली आहे.
जानेवारी महिन्यात अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवरील भव्यदिव्य मंदिर भाविकांसाठी खुले होणार आहे. तो दिवस तर अवघ्या भारतासाठी दिवाळी असणारच आहे; पण त्याआधीची दिवाळीही शनिवारी उदंड उत्साहात साजरी करण्यात आली. दुपारी 3 वाजता औपचारिक कार्यक्रम सुरू झाला. यावेळी शहरातून शोभायात्राही काढण्यात आली. सायंकाळी शरयू तीरावर असलेल्या 51 घाटांवर 20 हजार स्वयंसेवकांनी 21 लाख दिवे प्रज्वलित केले. दिव्यांच्या प्रकाशाने केवळ शरयू नदीचे पात्रच नव्हे, तर अवघी अयोध्या लखलखली.
एकाचवेळी 20 हजार स्वयंसेवकांनी 21 लाख दिवे प्रज्वलित करण्याचा विश्वविक्रमही अयोध्येने साजरा केला. अयोध्येतील या विश्वविक्रमाची नोंद गिनीज बुकात करण्यात आली असून, त्याचे प्रमाणपत्रही सायंकाळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपालांना प्रदान करण्यात आले.