
खेड :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे १३ आणि १४ जुलै रोजी चिपळूण, खेड आणि दापोली दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी खेडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, राज ठाकरे यांचा सध्याच्या राजकीय घडामोडीमुळे चिपळूणचा दौरा पुढे ढकलण्यात आला होता. पण आता हा दौरा होणार आहे.१३ तारखेला चिपळूण येथील मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर १४ जुलैला खेड येथील मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात येणार आहेत. त्यानंतर राज ठाकरे दापोली व मंडणगडला रवाना होणार आहेत. मनसेकडून ठाकरे गटाला युती संदर्भात कोणताही प्रस्ताव देण्यात आलेला नाही. हा निर्णय केवळ राज ठाकरेच घेऊ शकतात. त्यांनी तसा निर्णय घेतला, तर आम्ही त्यांच्यासोबत असणार आहोत, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. जनतेने ज्या विश्वासाने या आमदारांना निवडून दिले आहे. त्यांच्याकडून लोकशाहीचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. याविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपबरोबर गेले. यावरही त्यांनी जोरदार टीका केली. निवडणूक आयोगाने आता मतदारांना बोटावर शाई लावण्याऐवजी चुना लावावा, असेही ते उपहासाने म्हणाले. सध्याच्या परिस्थितीत जनतेच्या मतांचा आदर केला जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी खेडचे माजी नगराध्यक्ष व मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, नगरसेवक भूषण चिखले, शहर अध्यक्ष ऋषिकेश कानडे, खेडचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.